काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये देशभरातील हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून आपल्या विविध मागण्या सरकारदरबारी मांडल्या. यामध्ये अगदी दुष्काळापासून ते शेतमालाला योग्य भाव मिळावा अशा अनेक मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता. एकीकडे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असतानाच नाशिकमध्ये एका शेतकऱ्यांने आगळ्यावेगळ्या प्रकारे शेतमालाला मिळणाऱ्या कमी दराबद्दलचा निषेध नोंदवला आहे. या शेतकऱ्याच्या शेतातील ७५० किलो कांदा अवघ्या १ हजार ६४ रुपयांना विकाला गेला. म्हणजे प्रति किलो कांद्याला केवळ १ रुपया ४० पैसे दर मिळाला. त्यामुळे या शेतकऱ्याने या विक्रितून आलेले सर्व पैसे निषेध म्हणून पंतप्रधान सहाय्यता निधीला दान केले.

निफाड येथे राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे संजय साठे. यासंदर्भात पीटीआयशी बोलताना संजय यांनी आपली भूमिका मांडली. ‘मी या वर्षी माझ्या शेतामध्ये ७५० किलो कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र मला निफाड येथील बाजारपेठेत या कांद्याला सुरुवातीला एक रुपया प्रति किलो दर देण्याची ऑफर व्यापाऱ्यांनी दिली. मग मी दरासंदर्भात थोडे चर्चा केल्यानंतर अखेर व्यापाऱ्यांनी मला ७५० किलो कांद्याला प्रति किलो १ रुपया ४० पैशाचा दर देत १ हजार ६४ रुपये दिले. चार महिने शेतामध्ये राबून एवढ्या शेतमालाला इतकी तुटपुंजी रक्कम मिळाल्याने मला खूप दुख: झाले, म्हणून मी याचा निषेध करण्यासाठी ही १ हजार ६४ रुपयांची रक्कम पंतप्रधान मदतनिधीसाठी दान केली. तसेच हे पैसे मनी ऑर्डरने पाठवण्यासाठी ५४ रुपयांचा अधिक खर्च करावा लागला.’

शेतमालाला कमी दर मिळत असल्याबद्दल सरकारच्या धोरणांवर आपण नाराज असल्याचे संजय यांनी सांगितले. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. मात्र शेतकऱ्यांच्या दुःखांबद्दल सरकारची उदासीनता पाहून संताप होत असल्याचेही संजय म्हणाले. संजय यांनी २९ नोव्हेंबर रोजीच निफाड पोस्ट ऑफिसमधून ‘नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान’ या नावाने मनी ऑर्डर पाठवली आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी ५० टक्के कांद्याचे उत्पादन हे नाशिक जिल्ह्यामध्ये होते. असे असतानाच कांद्याला इतका कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

घेतली होती ओबामांची भेट

२०१० साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीवर आले असताना त्यांनी काही मोजक्या प्रगशील शेतकऱ्यांची भेट घेतली होती त्यामध्ये संजय यांचा समावेश होता. केंद्रीय कृषी मंत्रालयाने संजय यांची ओबामा भेटीसाठी निवड केली होती. ‘मी शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली हेल्पलाइन वापरत होतो. मी अनेकदा दिलेल्या क्रमांकावर कॉल करुन हवामानाचा अंदाज घेऊन शेतीसंदर्भातील निर्णय घेत असे. त्यामुळे माझ्या शेतातील उत्पन्न वाढलेले. याच संदर्भात मी स्थानिक रेडीओ चॅनेलवरून इतर शेतकऱ्यांना माहिती दिली होती. म्हणूनच कृषी मंत्र्यांनी माझी ओबामा भेटीसाठी निवड केली होती. मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये ओबामा यांच्या भेटी दरम्यान भरवण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये मी एका स्टॉल लावला होता. त्यावेळी ओबामा आणि मी एका दुभाषकाच्या मदतीने काही मिनिटे संवाद साधला होता,’ अशी आठवण संजय यांनी त्या भेटीबद्दल बोलताना सांगितली.

Story img Loader