नाशिक – आपआपसातील भांडणात दोन दुकानदारांमध्ये एकमेकांना धडा शिकविण्याची भाषा केली जात असताना दुकानाला आग लागल्याचा प्रकार घडल्याने त्याची झळ अन्य व्यावसायिकांनाही बसली. फर्निचर दुकानासह गॅरेज तसेच अन्य काही दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. मंगळवारी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ झालेल्या या अग्नीतांडवात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

इंदिरानगर येथील साईनाथ नगर चौफुलीजवळ जॉगिंग ट्रॅकलगत असलेले डी. एम. फर्निचर हे वसीम अख्तर आणि वसीम कुरेशी यांच्या मालकीचे दुकान आहे. या दोघांचा एकमेकांमध्ये काही वाद आहे. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास या दोघांमध्ये मागील भांडणाची कुरापत काढून पुन्हा भांडण सुरू झाले. दुकानाचे नुकसान करण्याची धमकी एकमेकांना देण्यात आली. शेजारी असलेल्या न्यु डिलक्स गॅरेजमधील कामगार हे भांडण सोडविण्यासाठी आले. त्याचवेळी रासायनिक द्रव खाली पडल्याने फर्निचर दुकानाला आग लागली. दुकानात फोम, कापड, कापूस, लाकूड, प्लास्टिक असे चटकन पेट घेणार सामान असल्याने काही कळण्याच्या आत दुकानातील सर्व सामान आगीच्या विळख्यात सापडले.

यावेळी शेजारील गॅरेजमधे असलेल्या गाड्या बाहेर रस्त्यावर आणण्याचे काम तेथील कामगारांनी युध्दपातळीवर केले. गॅरेजमधे त्यावेळी सहा गाड्या होत्या. दोन गाड्या आगीच्या विळख्यात सापडल्या. गाड्या बाहेर काढताना एका कर्मचाऱ्याच्या हाताला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या दुकांनानाही आगीची झळ पोहचली.

दरम्यान, आगीची माहिती मुख्य अग्निशमन विभागाला देण्यात आली. मुख्य अग्निशमन बंबासह अन्य ठिकाणाहूनही बंब मागवण्यात आले. पाच ते सहा बंबांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आग विझवली. फर्निचरचे दुकान आणि गॅरेजचे आगीत नुकसान झाले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने अग्निशमन विभागाचे कर्मचारी, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांना गर्दी हटविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. जॉगिंग ट्रॅककडील रस्ता काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. सायंकाळी उशीरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

Story img Loader