नाशिक : अशोक स्तंभ जवळील अतिशय दाट वस्तीच्या भागात मंगळवारी सकाळी जुना वाडा आगीत भस्मसात झाला. या वाड्यात कोणी वास्तव्यास नव्हते. परंतु, लगतच्या वाड्यातील पाच ते सहा कुटुंबांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवार पेठेतील कंसारा मंगल कार्यालयासमोर जुनी तांबट अळीत हा वाडा आहे. विठ्ठलभाई तांबट यांचा हा जुना वाडा पडिक स्वरुपात आहे. तिथे कोणी रहात नव्हते. पहाटे साडेपाच वाजता या वाड्यास आग लागली. ही बाब लक्षात येताच आसपासच्या नागरिकांनी या घटनेची माहिती पंचवटी अग्निशमन दलास दिली. काही वेळात या केंद्राचे दोन व मुख्यालयाचा एक असे तीन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मध्यवर्ती भागातील अतिशय दाट वस्तीचा हा परिसर आहे.

हेही वाचा…मंत्रिमंडळाआधीच पालकमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी, अजित पवार गटाची शिंदे गटासह भाजपला शह देण्याची तयारी

आग लागलेल्या वाड्याजवळील दुसऱ्या वाड्यात पाच ते सहा कुटुंब वास्तव्य करतात. प्रारंभी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे संजय कानडे यांनी दिली. ज्या वाड्याला आग लागली, त्याच्या बांधणीत मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडाचा वापर झालेला आहे. त्यामुळे आग पसरली. तिच्यावर नियंत्रण मिळवण्यास बराच वेळ लागला. अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंंतर आग नियंत्रणात आली. तोपर्यंत वाड्याचा बराचसा भाग भस्मसात झाला होता. आग विझवल्यानंतरही वाड्यातील लाकूड अधुनमधून पेट घेत होते. त्यामुळे बराच वेळ पाण्याचा मारा करावा लागला. आग नेमकी कशामुळे लागली त्याची स्पष्टता झालेली नाही. या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. जुन्या वाड्याच्या दोन्ही बाजुने पाणी मारून आगीची झळ आसपासच्या भागाला बसणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याचे या विभागाचे के. पी. पाटील यांनी सांगितले

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik fire in old palace on tuesday morning near ashoka pillars sud 02