नाशिक : इयत्ता १० वी परीक्षेत पहिल्याच दिवशी येवला तालुक्यातील अंदरसुल येथील केंद्रात कॉपी पुरविण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते. याशिवाय ग्रामीण भागात इतरही काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे सांगण्यात येते. बंदोबस्तासाठी पोलिसांची संख्या कमी असल्याने टवाळखोरांची हिम्मत वाढली. नाशिक शहरातील केंद्रांवर शांतता राहिली. मातृभाषा मराठीची प्रश्नपत्रिका सोडवितांना कुठेही कॉपीचा प्रकार घडला नसल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला.

विभागात ४८६ केंद्रांत दोन लाख दोन हजार विद्यार्थ्यांनी मराठीची परीक्षा दिली. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी ३० हून अधिक भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांतील दोन हजार ८२८ शाळांमध्ये परीक्षा होत आहे. विभागातून दोन लाख दोन हजार ६२७ परीक्षार्थी आहेत. परीक्षेच्या पहिल्या दिवशी केंद्रांवर सकाळपासूनच पालक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली. परीक्षेसाठी केंद्रात जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनेक विद्यार्थी उजळणी करत होते. विद्यार्थी केंद्रात परीक्षा देत असताना बहुसंख्य पालक केंद्राबाहेर परीक्षा संपेपर्यंत थांबून राहिले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. काही ठिकाणी परीक्षा केंद्राच्या संरक्षक भिंती ओलांडून इमारतीच्या खिडक्यांमधून कॉपी पुरविण्यात आल्या. अंदरसुल येथील परीक्षा केंद्राभोवती संरक्षक भिंत नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांच्या इतर नातेवाईकांनी गर्दी केली होती. वर्गामध्ये कॉपी पोहचविण्याचे प्रकार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. केंद्रावर पोलीस बंदोबस्त कमी असल्याने टवाळखोरांची केंद्रावरील परीक्षकांना धमकी देण्यापर्यंत मजल गेली. सुरगाणा तालुक्यातील पळसन, उंबरठाण या ठिकाणीही गैरप्रकार झाले. शिक्षण मंडळाने मात्र कुठेही गैरप्रकार झाला नसल्याचे म्हटले आहे. शिक्षण मंडळाचे नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे यांनी, विभागात कुठेही गैरप्रकार झालेला नसून शांततेत परीक्षा पार पडल्याचा दावा केला.

संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्ताचा अभाव

इयत्ता १२ वी परीक्षेवेळी पहिल्याच दिवशी येवला येथील एका केंद्रावर टवाळखोरांनी पोलिसांना शिवीगाळ करत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भात येवला तालुका पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द गुन्हा दाखल आहे. ही पार्श्वभूमी असताना इयत्ता १० वी परीक्षेसाठी पोलिसांनी अशा केंद्रांवर अधिक प्रमाणावर बंदोबस्त ठेवणे आवश्यक होते.

विद्यार्थ्यांसाठी मदतवाहिनी

परीक्षा काळात विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विभागीय मंडळाच्या २५३-२९५०४१० या क्रमांकावर संपर्क साधावा. परीक्षेचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांवर येणारा ताण पाहता स्वतंत्र मदतवाहिनी सुरू करण्यात आली आहे. मदतीसाठी नाशिक जिल्ह्याकरिता किरण बावा (९४२३१८४१४१), धुळ्यासाठी नंदकिशोर बागूल (९४२०८५२५३१), जळगावसाठी दयानंद महाजन (७७६८०८२१०५) आणि नंदुरबारसाठी राजेंद्र माळी (९४०४७४९८००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader