नाशिक – कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने ३४ लाखांपेक्षा अधिक रकमेचा गंडा घालणाऱ्या टोळीतील प्रमुख संशयित भूषण वाघ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सिडकोतील उत्तमनगर येथे भूषण वाघ, वर्षा पाटील, मेघा बागूल, मनिषा पाटील, अमित बने, सुरेश पाटील, चंद्रशेखर कडू, एकनाथ पाटील, योगेश पाटील यांसह काही जणांनी एकत्र येत उत्तमनगर परिसरात हाक मराठी अर्बन निधी बँक सुरू केली. या माध्यमातून गरजू लोकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते. कर्ज मिळवून देतो, असा दावा करुन बँकेचे सभासद शुल्क, प्रकल्प अहवाल, विमा, पडताळणी अशी वेगवेगळी कारणे दाखवत गरजूंकडून पैसे उकळणे सुरु केले. या माध्यमातून ३४ लाख १५ हजार ३८२ रुपये अनेकांकडून घेण्यात आले. ठराविक कालावधी उलटूनही कर्ज दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने संशयितांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – जिल्ह्यात आजपासून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा – विविध कार्यक्रमांचे आयोजन

हेही वाचा – एका सामान्य शिक्षकाच्या विजयाची सर्वत्र चर्चा

हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख इरफान शेख यांनी माहिती दिली. कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक झाल्याविषयी तक्रार प्राप्त होताच संशयित भूषण याला अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन शेख यांनी केले आहे.