नाशिक – मोटारीचा भोंगा वाजविल्यावरून संतप्त झालेल्या टोळक्याने मारहाण करुन वाहनधारकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नेम चुकवल्याने वाहनधारक बचावला. नंतर टोळक्याने मोटारीवर मोठा दगड टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शहरातील पाथर्डी फाटा भागातील आरके लॉन्ससमोर टोळक्याने धुडगूस घालत दहशत निर्माण केली. पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

काही महिन्यांपासून शहरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. शनिवारी सायंकाळी पाथर्डी फाटा परिसरातील घटनाक्रमाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. टोळक्यातील एकाकडे शस्त्र असल्याने कोणी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. अनेकांनी काढता पाय घेतला. काहींनी हा घटनाक्रम भ्रमणध्वनीत चित्रित केला. त्यावरून टोळक्याचा धुडगूस उघड झाला. याबाब़त शेतकरी बाकेराव डेमसे (६१, नांदूररोड, पाथर्डी) यांनी तक्रार दिली. नट्या उर्फ ऋषिकेश नवले, डी. भाई, यशोदीप खैरनार (२७, देवळा) आणि अल्केश मोरे (२४, गजानन पार्क, खर्जुल मळा, सिन्नर फाटा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. डेमसे हे आपल्या मोटारीेने मुलाच्या कार्यालयाकडे निघाले होते. आरके लॉन्ससमोर टोळके वाहनासमोर पायी चालत होते. यावेळी डेमसे यांनी भोंगा वाजविला असता संशयितांनी त्यांना मोटार थांबविण्यास भाग पाडले. दोन संशयितांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. एकाने घातक हत्याराने वार केले. डेमसे वार चुकवून मोटारीत जावून बसले. तेव्हा अन्य दोन संशयितांनी डेमसे आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या राहुल साळुंखे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मोटारीसह काचेवर मोठे दगड फेकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
टोळक्याने सार्वजनिक ठिकाणी हत्यार घेऊन आरडाओरड केली. त्यांचा धुडगूस पाहून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गांभिर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवली. संशयित खैरनार आणि मोरे यास अटक करण्यात आली. न्यायालयाने संशयितांची दोन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पहाटे रस्त्यावर मद्यपान ?

कॉलेज रोड पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डिसुजा कॉलनीत जाणाऱ्या मार्गावर शनिवारी पहाटे सव्वातीन ते चार या वेळेत वाहने उभी करुन काही जणांनी मद्यपान केले. पहाटेच्या शांततेत प्रारंभी वाहनातील गाणी वाजवली. नंतर ती बंद करून मोठ्या आवाजात गप्पांचा फड रंगला. रस्त्यात तीन-चार वाहने उभी करून संबंधितांचे तासभर मद्यपान सुरू होते. मद्य संपल्यानंतर दुचाकीवर कोणीतरी ते देऊन गेल्याचे स्थानिकांच्या दृष्टीपथास पडले. तासाभराने ही वाहने निघून गेली. कॉलेज रोडकडून डिसुजा कॉलनीत जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला. सुमारे तासभर टोळके मुक्तपणे मद्यपान करत होते. मोठ्या आवाजात बोलत होते. परंतु, पोलीस चौकीपर्यंत हा आवाज कसा गेला नाही, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.