नाशिक : तुमच्या खात्यात टाकलेले २० लाख रुपये कुठे आहेत, ते आम्हाला परत द्या, असे दरडावत सहा जणांच्या टोळक्याने डॉक्टरच्या घरात धुडगूस घातला. शहरातील कॉलेज रोडवरील येवलेकर मळा भागात ही घटना घडली. यावेळी टोळक्याने कुटुंबियांना धक्काबुक्की करुन डॉक्टरच्या भावास मारहाण केली. याबाबत डॉ. संजय मुंदडा (येवलेकर मळा, कॉलेज रोड) यांनी तक्रार दिली.
मुंदडा कुटूंबिय सायंकाळी घरात असताना हा प्रकार घडला. अनोळखी सहा जणांचे टोळके आरडाओरड करुन घरात शिरले. एकाने ब्रिजेश मुंदडा कुठे आहेत, असा प्रश्न केला. एका संशयिताने तुमच्या खात्यात टाकलेले २० लाख रुपये कुठे आहेत, ते आम्हाला परत द्या, अशी मागणी केली. यावेळी डॉ. मुंदडा यांचा पुतण्या सिद्धार्थने तुमच्यातील एकाने येथे थांबा आणि इतरांनी बाहेर जावे, असा सल्ला दिल्यानंतर टोळके ब्रिजेश मुंदडा यांना पकडून घराबाहेर नेऊ लागले. त्यांना मारहाण केली.
कुटुंबातील सदस्यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने महिलांनाही धक्काबुक्की केली. या झटापटीत ब्रिजेश याच्या गळ्यातील सोनसाखळी तुटून गहाळ झाली. संतप्त टोळक्याने चप्पल ठेवण्याची रचना कुटूंबियांच्या दिशेने भिरकावत पलायन केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.