अंतिम सामन्यात अहमदनगर संघाचा पराभव
सोलापूर येथे आयोजित ३२ व्या महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या महिलांनी सलग तिसरे विजेतेपद मिळविले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाशिकच्या पायल शर्मा, आचल सोनावणे, कल्याणी देवरे आणि प्रांजळ काकळीज यांनी एकमेकांमध्ये योग्य समन्वय ठेवत अहमदनगर संघावर वर्चस्व राखले. हा अंतिम सामना नाशिकने १५-१२, १५-१३ असा सरळ दोन सेटमध्ये जिंकला. त्याआधी नाशिकने उपांत्य फेरीत सांगलीला आणि साखळीत औरंगाबाद, जालना संघांना पराभूत केले. विजेतेपद मिळविणाऱ्या संघातील पायल, आचल, कल्याणी आणि प्रांजल हे चारही खेळाडू नांदगाव येथील नूतन जिमखाना क्लबचे आहेत.
या खेळाडूंना शुटिंग बॉलचे राष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक आणि संघटक बाळासाहेब थोरात यांचे अनेक वर्षांपासून मार्गदर्शन मिळत आहे. याआधीही नाशिकच्या महिलांनी जालना आणि परभणी येथे झालेल्या दोन राज्य स्पर्धेचेही विजेतेपद मिळविले आहे.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे नाशिकच्या पायल शर्माची महाराष्ट्राच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. आचल, कल्याणी आणि प्रांजल यांचीही महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नाशिकच्या या चारही खेळाडू डिसेंबरमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.