जळगाव : शहरातील सराफ बाजारात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सुमारे १३३९ रुपयांची घट नोंदविण्यात आल्यानंतर सोने दर प्रतितोळा ९२ हजार १८५ रुपयांपर्यंत खाली आले. दरवाढीनंतर उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. सोने दराने एक एप्रिलला ९४ हजार ३४८ रुपयांपर्यंत मजल मारत नवा उच्चांक केला होता. सोने दरातील उच्चांकी दरवाढीनंतर सराफ बाजारात चांगलीच खळबळ उडाल्याचे पाहण्यास मिळाले होते.

सोने लवकरच एक लाखाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त झाली होती. प्रत्यक्षात शुक्रवारी तब्बल १०३० रुपयांची घसरण झाल्याने सोने ९४ हजाराच्या खाली आले. दुसऱ्या दिवशी शनिवारी देखील घसरण कायम राहिल्याने सोने दराने ग्राहकांसह व्यापाऱ्यांना दिलासा दिला. उच्चांकी दरवाढीनंतर ग्राहक कमी झाल्याच्या स्थितीत एकूण उलाढालीवर विपरीत परिणाम झाल्याने मंदीला तोंड देणाऱ्या सराफ बाजारात त्यामुळे ग्राहकांची थोडीफार गर्दीही दिसून आली.

चांदीत दोन दिवसात ९२७० रुपयांची घट

जळगावात शुक्रवारी चांदीचे दर ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यात दुसऱ्या दिवशी शनिवारी पुन्हा ५१५० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदी प्रतिकिलो ९२ हजार ७०० रुपयांपर्यंत घसरली. दरम्यान, दोनच दिवसात तब्बल ९२७० रुपयांची घट झाल्याने लग्नसराईसाठी चांदीची खरेदी करणाऱ्यांची संख्या आता वाढण्याची चिन्हे दिसून आली आहेत.