नाशिक: कारागृहातून बाहेर पडलेल्या सराईत गुन्हेगाराची साथीदारांनी शरणपूर रस्ता भागात अलिशान मोटारीतून मिरवणूक काढणे, त्यांच्या अंगलट आले असून मिरवणुकीत सहभागी झालेल्यांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारागृहातून बाहेर आलेल्या सराईत हर्षद पाटणकरची रवानगी पुन्हा कारागृहात केली आहे.
हर्षद पाटणकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर शहर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. वर्षभर तो कारागृहात होता. कारागृहातून तो बाहेर आल्यानंतर साथीदारांनी मंगळवारी दुपारी अलिशान मोटारीतून त्याची मिरवणूक काढली. आरडाओरड केली. १० ते १५ दुचाकींसह बेथेलनगर ते आंबेडकर चौक, साधू वासवानी रस्ता तसेच शरणपूर परिसरात ही मिरवणूक काढली गेली. यावेळी वाहनांचे कर्कश भोंगे वाजविले गेले. संशयितांनी घोषणाबाजी केली. मिरवणुकीत सहभागी झालेले संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई झाली आहे. या घटनाक्रमाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
नाशिक: कारागृहातून बाहेर पडलेल्या सराईत गुन्हेगाराची त्याच्या साथीदारांनी शरणपूर रस्ता भागात अलिशान मोटारीतून मिरवणूक काढली होती. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारागृहातून बाहेर आलेल्या सराईत हर्षद पाटणकरची रवानगी पुन्हा कारागृहात केली आहे. pic.twitter.com/nZN8TYa0BM
— LoksattaLive (@LoksattaLive) July 26, 2024
हेही वाचा : “विजयाने हुरळू नका”, रवींद्र मिर्लेकर यांचा ठाकरे गटाच्या गटप्रमुखांना सल्ला
नागरिकांमध्ये दहशत माजविण्यासाठी गुन्हेगारांकडून झालेली कृती ही कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे. याबाबत समाजमाध्यमांमधून पडसाद उमटल्यावर पोलिसांनी तातडीने हर्षदसह त्याचे नातेवाईक, साथीदार अशा ३० जणांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आतापर्यंत १९ जणांना ताब्यात घेण्यात आले. मिरवणुकीत वापरलेली मोटार, तीन दुचाकी जप्त करण्यात आली. ताब्यात असलेले व इतर गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. हर्षदला अन्य गुन्ह्यामध्ये अटक करुन त्याची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली.