विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली असतानाही स्वत: उमेदवारी अर्ज न भरता, मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवून स्वपक्षाचीच कोंडी करणारे आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. यानंतर आता काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून सत्यजित तांबे यांनाही निलंबित करण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेस कमिटीला करण्यात आली आहे.
सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र त्यांनी नाशिक पदवीधर मतदार निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून केंद्रीय नेतृत्वाकडे अहवाल पाठवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी सूचना केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची दाट शक्यता आहे.
नक्की पाहा – Photos : कपिल पाटील, नाना पटोले ते भाजपा; नाशिकमध्ये सत्यजीत तांबे नेमकं काय म्हणाले? वाचा महत्त्वाची विधानं
उमेदवारी अर्ज मागे घेण्यास काहीसा वेळ शिल्लक असताना काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला अशी सूचना केल्याचे समोर आले आहे.