जळगाव : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, ३० जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पॉइंट पेन किंवा अन्य साहित्याचा वापर करू नये, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीसाठी मतदान हे पसंतीक्रमानुसार असल्याने पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात १ हा अंक लिहून मतदान करावे. १ हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा. यापुढील पसंतीक्रम जसे २,३,४ नोंदविणे ऐच्छिक आहे. जेवढे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, त्या सर्वांचे संख्येइतके पसंतीक्रम मतदारास नोंदविता येतील. मतपत्रिकेवर नमूद करावयाचा पसंतीक्रम केवळ अंकांमध्ये आणि एकाच भाषेत (देवनागरी, इंग्रजी, रोमन किंवा राज्य घटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये नमूद कोणतीही इतर भारतीय भाषा) नमूद करावयाचा आहे. शब्दात अर्थात एक, दोन, तीन यानुसार लिहू नये. मतपत्रिकेवर नाव, कोणताही शब्द, सही, अंगठा करू नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik graduate constituency election instruction to use purple sketch pen for voting ysh