नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज घेण्याच्या अवघे काही तास अगोदर मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. कारण, ठाकरे गटाच्या नेत्या शुभांगी पाटील या संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींवर भाजपी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीश महाजन म्हणाले, “यामध्ये खळबळजनक काय मला कळत नाही. अर्ज मागे घेण्याची वेळ आता तासाभरावर आहे. त्यामुळे उमेदवार कोण कुठे, कोण कुठे हा त्यांचा प्रश्न आहे. नॉटरिचेबल आहेत, यामध्ये खळबळजनक काहीच नाही.” टीव्ही 9 ते बोलत होते.
हेही वाचा : “…तर उमेदवारीचा घोळ झाला नसता” काँग्रेस नेत्यांचा उल्लेख करत शरद पवारांचं मोठं विधान!
याचबरोबर, भाजपाकडून संपर्क साधला जात आहे, त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. यावर गिरीश महाजन म्हणाले, “नाही, कोणी अर्ज घ्यावा किंवा राहू द्यावा यासाठी आमचा कुठलाही प्रयत्न सुरू नाही. आमचा त्यांचा संपर्कही नाही आणि संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला गेला नाही. त्यांनी उभारावं किंवा अर्ज मागे घ्यावा तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही एबी फॉर्म दिलेला नाही, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यानंतर आमचा उमेदवार जाहीर होईल.”
हेही वाचा : नाशिक पदवीधरमध्ये कोण कोणाचे हा संभ्रम
शुभांगी पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही आणि सत्यजीत तांबेंच्या मागे आता भाजपा उभी राहिली आहे. त्यामुळे शुभांगी पाटील यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला. यावर गिरीश महाजन म्हणाले, “त्या महिनाभरापूर्वी आल्या होत्या आणि मला पक्षात प्रवेश द्या अशी असं म्हणत अनेक दिवसांपासून त्या मागे लागल्या होत्या. अनेकदा मुंबईतही आल्या होत्या, ही वस्तूस्थिती आहे आणि आम्ही त्यांना प्रवेश दिला होता. पण तिकीटाचं आश्वासन कुठेही आम्ही त्यांना दिलेलं नव्हतं.”