नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्ह्यातील आढाव्यानिमित्ताने पालकमंत्री दादा भुसे आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे दृकश्राव्य माध्यमातून का होईना, प्रथमच एका व्यासपीठावर समोरासमोर आले. राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भुजबळ आग्रही होते. परंतु, शिवसेना शिंदे गटाने तडजोड केली नाही. परिणामी, पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत आजवरची जिल्हा नियोजन समितीची बैठक असो वा अन्य कुठलीही आढावा बैठक असो. भुजबळ यांनी अंतर राखले होते. विधानसभा निवडणुकीची घटीका समीप येताच त्यांना हा दुरावा कमी करणे क्रमप्राप्त ठरल्याचे दिसत आहे.
पालकमंत्री भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दूरदृश्यप्रणालीद्वारे लाडकी बहीण योजनेच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, तसेच दिलीप बनकर, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, मुफ्ती मोहम्मद इस्माईल या आमदारांसह काही अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सुनील दुसाने, मनपाचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.
हेही वाचा…नाशिक : टपाल विभागातील गैरव्यवहाराच्या दोन घटना उघड
भुसे यांनी योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली. अंगणवाडी सेविकांना अर्ज भरून देण्यासाठी प्रतिअर्ज ५० रुपये देण्यात येणार आहेत. अतिदुर्गम भागातील महिलांचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, रेशन दुकानदारांचे सहाय्य घ्यावे, असे त्यांनी बैठकीत सूचित केले.
हेही वाचा…नाशिक : अंबड प्रकल्पग्रस्तांचे पायी मुंबईकडे कूच
पालकमंत्री भुसे आणि अन्न नागरी पुरवठामंत्री भुजबळ हे एखाद्या बैठकीत प्रदीर्घ काळानंतर समोरासमोर आले. ही बैठक दृकश्राव्य माध्यमातून होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये पालकमंत्रिपद भुजबळ यांच्याकडे होते. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते भुसे यांच्याकडे आले. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर तडजोडीत पालकमंत्रिपद घेण्याचे आटोकाट प्रयत्न झाले. परंतु, शिवसेना शिंदे गटाने भुजबळांना न जुमानता हे पद कायम ठेवले. तेव्हापासून भुजबळ सत्तेत असूनही कधी जिल्हा नियोजन व अन्य महत्वाच्या विषयावर पालकमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत उपस्थित राहिले नव्हते. लोकसभा निवडणुकीत भुजबळांसाठी शिवसेना शिंदे गटाने नाशिकची जागा सोडली नाही. लाडकी बहीण योजनेच्या बैठकीच्या निमित्ताने भुसे-भुजबळांचे प्रथमच ऑनलाईन एकत्र येणेही आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल देणारे ठरले, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात होत आहे.