नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही; पाणीकपातीला आक्षेप
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून आगामी काळात जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. शहरात पाणीकपातीला खुद्द महाजन यांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे मंगळवारी शहरात पाणीपुरवठा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. या विरोधात मनसेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. या स्थितीत पालकमंत्री पाणीटंचाईवर मात करण्याच्या उपायांवर भाष्य करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात जिल्हा उद्योग पुरस्कार, गुणवंत खेळाडू आणि विशेष सेवापदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
शानदार संचलनाने राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. विविध दलाच्या पथकांनी संचलनात सहभाग घेतला. भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या घोडदलाने सर्वाचे लक्ष वेधले. शासकीय विभाग व योजनांचे चित्ररथ सहभागी झाले. महाजन यांनी टंचाई निवारणार्थ कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील अनेक भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने उपयोग करण्याची गरज आहे. कमी पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजले आहेत. अतिवृष्टी, वादळ, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाईसाठी असलेली ५० टक्के नुकसानीची अट ३३ टक्क्यांवर आणली गेली आहे. नैसर्गिक आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांच्या रूपांतरित पीक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी तीन वर्षांवरून पाच वर्षे करण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाल्याचे महाजन यांनी नमूद केले. जिल्ह्यात खरिपाच्या नुकसान भरपाईपोटी १८५ कोटी उपलब्ध करून देण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गाव टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ८० कोटींची साडे तीन हजार कामे पूर्ण झाली असून मार्चअखेरीस २६५ कोटींची १० हजार कामे होऊन २२९ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पुढील वर्षी २१८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात पाच वर्षांत २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. टंचाईवर मात करण्यासाठी चाललेल्या कामांची माहिती महाजन यांनी दिली असली, तरी त्यांच्या आक्षेपामुळे शहरात कपातीचा निर्णय पालिका प्रशासनाने अद्याप लागू केलेला नाही. तातडीने कपात लागू न केल्यास आठवडय़ातून दोन दिवस कपात लागू करावी लागेल, असा इशारा मनसेने आधीच दिला आहे. पाण्यासारख्या विषयात चाललेल्या राजकारणामुळे उन्हाळ्यात नाशिककरांची काय स्थिती होणार, याबद्दल धास्ती व्यक्त होत आहे.
शासनाने मेक इन महाराष्ट्र, प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान, स्वच्छता अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, ई लोकशाही दिन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी यासारख्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबरोबर विकासाला गती दिली जात असल्याचे महाजन म्हणाले. पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत १९ लाख घरांना २०१९ पर्यंत वीज दिली जाणार आहे. मांगी-तुंगी तीर्थक्षेत्र विकासासाठी ४० कोटींचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला. भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन सर्वाच्या सहकार्याने यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सोहळ्यात विविध पुरस्कारांचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात जिल्हा उद्योग पुरस्काराने (२०१२) टेक्नोफ्लो इंडस्ट्रीज व टेक्नोशेल अ‍ॅटोमेशन, २०१३ वर्षांसाठी ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग प्रा. लि. आणि सुयश मेटाटेक तसेच २०१४ साठी आर. डी. इन्फ्रा इक्विपमेंट्स आणि एक्सेल इंजिनीअरिंग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामध्ये विशेष कामगिरीबद्दल सौरभ बागूल, के. एल. काबरा विद्यालय (मालेगाव) यांना, तर गुणवंत खेळाडू म्हणून रोशनी मुर्तडक व दिग्विजय सोनवणे (दोन्ही तलवारबाजी), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक अजीज सैय्यद (हॉकी), गुणवंत संघटक म्हणून निर्मला चौधरी (तलवारबाजी) यांना सन्मानित करण्यात आले. विशेष सेवापदक जाहीर झालेले साहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे, अशोक नखाते, दीपक गिऱ्हे, गजानन राजमाने, पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, अनिल बडगुजर, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे, स्वप्निल नाईक, हेमंत बेंडाळे, कमलेश बच्छाव, चंद्रकांत पाटील, सचिन साळुंखे आणि सुनील कराडे आदींचा समावेश आहे.

Story img Loader