नाशिक – विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर विरोधक नाराज असतील तर, त्यांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. मात्र न्यायदान करणाऱ्या व्यक्तीवर आक्षेप घेणे, हे देशाच्या व राज्याच्या लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे, असा दावा करत पालकमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाला लक्ष केले.
ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी, विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर टीका केली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोपानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर भुसे यांनी विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा कायदे, नियम व वस्तुस्थितीवर आधारीत असल्याचे नमूद केले.
हेही वाचा…निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्कीच कापू; येवल्यात छगन भुजबळांची पतंगबाजी
उद्या विरोधक सर्वोच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिल्यास ते त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणार का, असा प्रश्न भुसे यांनी केला. ठाकरे गट जनतेची दिशाभूल करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी हाणला.
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून विनाकारण टीका करून विरोधक खालची पातळी गाठत असल्याचे भुसे यांनी सांगितले. महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणि प्रकल्प होत असल्याने विरोधकांची पायाखालची जमीन सरकली आहे. दावोस दौऱ्यात होणाऱ्या सामंजस्य करारांची माहिती मुख्यमंत्र्यांकडून दिली जाईल. त्याची धास्ती विरोधकांना आता वाटत आहे.
हेही वाचा…नाशिक : गुन्हे अन्वेषण प्रशिक्षणात रस्ता सुरक्षेचा समावेश
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान, शेतकऱ्यांना निकषापेक्षा अधिक नुकसान भरपाई आणि एक रुपयात विमा योजना आदी योजना राबविल्याकडे लक्ष वेधत भुसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. जितेंद्र आव्हाड यांच्या रामाविषयीच्या विधानाचा भुसे यांनी समाचार घेतला. मतांच्या लाचारीसाठी माणूस किती खालची पातळी गाठतो, यांच्या बुध्दिची कीव करावीशी वाटते, असे ते म्हणाले.