नाशिक : राज्यात ठिकठिकाणी गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळत असल्याने जिल्हा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित आस्थापनांनी आपआपल्या पातळीवर आवश्यक उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये याविषयी माहिती देण्यावर भर देण्यात येत आहे.
राज्यात पुण्यापाठोपाठ नांदेड, जळगाव, नंदुरबार येथे जीबीएसचे रुग्ण आढळले. राज्यात आतापर्यंत पाच जणांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याने जिल्हा आरोग्य विभागाकडून आवश्यक कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली. अद्याप जिल्ह्यात जीबीएसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात १० खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या निकषांची ३४ आरोग्य केंद्रांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय सर्वांची एकत्रित बैठक घेत चर्चा करण्यात आली असल्याचे डाॅ. शिंदे यांनी सांगितले.
दुसरीकडे, नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना जीबीएससदृश आजाराची लक्षणे आढळल्यास महानगरपालिकेशी संपर्क करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. याविषयी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण यांनी माहिती दिली. शहरात जीबीएसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. आवश्यक उपाययोजना म्हणून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आणि जाकीर हुसेन रुग्णालय येथे कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जीबीएससदृश रुग्ण आढळल्यास आवश्यक तपासणी करुन त्या बाबतचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील, असे डॉ. चव्हाण यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हा आजार विषाणू संसर्गामुळे होतो. थकवा, झिणझिण्या आणि पाय-हातांमधील कमजोरी ही प्रमुख लक्षणे आहेत. स्वच्छता, शुद्ध पाणी आणि आरोग्यदायी आहार यांच्याद्वारे जीबीएसपासून स्वतःचे संरक्षण करता येते. लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.