लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : आठवड्यापासून ३६ ते ३८ अंशाच्या दरम्यान रेंगाळणाऱ्या तापमानाने सोमवारी हंगामात प्रथमच ४० अंशांचा टप्पा ओलांडत ४०.४ या उच्चांकी तापमानाची नोंद केली. सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत असून उष्णतेची लाट आल्याची स्थिती आहे. एप्रिलच्या मध्यावर नाशिकमध्ये टळटळीत उन्हाळ्याची अनुभूती येत असताना जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाचा शिडकावा झाल्याने उकाड्यात आणखी भर पडली.
थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उन्हाळ्यात तापमान दरवर्षी ४० अंशांचा टप्पा ओलांडत असते. यंदा पाऊसमान कमी राहिले. तसेच थंडीची तीव्रताही फारशी जाणवली नव्हती. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कसा असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याची तीव्रता सध्याच्या तापमानातून लक्षात येत आहे. आठवडाभरापासून नाशिकचे तापमान ३६.४ ते ३८.४ या दरम्यान राहिले होते. सोमवारचा दिवस सर्वांची परीक्षा पाहणारा ठरला. तापमानात लक्षणीय वाढ होऊन ते ४०.४ या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात म्हणजे २८ मार्चला ३९.४ इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती.
आणखी वाचा-नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन
वाढत्या तापमानाने अगदी सकाळपासून उन्हाचे चटके बसत आहेत. उकाड्यात कमालीची वाढ झाली. रात्रीचा गारवा गायब झाला असून पंखे, वातानुकूलित यंत्रांशिवाय जीव कासावीस होत आहे. ग्रामीण भागात हीच स्थिती आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वातावरण आमुलाग्र बदलले. सकाळी आठ वाजेपासून ऊन जाणवते. उन्हाच्या तीव्र झळ्यांनी दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट पसरतो. शेतीची कामाची लगबग सुरू आहे. उन्हामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांनी शेती कामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत ते काम करतात आणि अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत झाडाच्या सावलीत विश्रांती घेणे भाग पडते. चार वाजेनंतर पुन्हा शेतीची कामे सुरू होतात. दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळले जात आहे. रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणारे नागरिक टोपी किंवा उपरणे डोक्यावर घेऊन फिरतांना दिसून येतात. थंड पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
हलकासा शिडकावा
दिंडोरी, मखमलाबाद, पेठ परिसरातील काही भागात अवकाळीचा शिडकावा झाला. दिंडोरीच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह काही वेळ पाऊस झाला. जिल्ह्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. चांदवडमध्येही पाऊस कधीही कोसळेल, अशी स्थिती होती. हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह अवकाळीची शक्यता वर्तविली आहे.