नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारपासून इयत्ता १२ वी परीक्षा प्रारंभ होत आहे. नाशिक विभागातील २८१ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास सोडविण्यासाठी मंडळातर्फे मदतवाहिनी सुरू करण्यात आली आहे.११ फेब्रुवारी ते १८ मार्च हा परीक्षेचा कालावधी आहे. विभागात नाशिक १२५, धुळे ४७, जळगाव ८१, नंदुरबार २८ याप्रमाणे २८१ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १३ नवीन केंद्राची भर पडली आहे.
एक हजार १०८ महाविद्यालयांमध्ये ही परीक्षा होणार असून कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य शाखांमधील एक लाख ६८ हजार १९६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात चार तृतीयपंथीयांचा समावेश आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विभागीय मंडळाच्या वतीने मदतवाहिनी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ०२५३-२९५०४१० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांवर येणारा ताण पाहता स्वतंत्र मदतवाहिनी सुरू करण्यात आली आहे. मदतीसाठी नाशिक जिल्ह्याकरिता किरण बावा (९४२३१८४१४१), धुळ्यासाठी नंदकिशोर बागूल (९४२०८५२५३१), जळगावसाठी दयानंद महाजन (७७६८०८२१०५) आणि नंदुरबारसाठी राजेंद्र माळी (९४०४७४९८००) यांच्याशी संपर्क साधावा.
परीक्षा नकलमुक्त होण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका सोडवितांना कोणी नकल करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. बारावी परीक्षेच्या पूर्वसंध्येला पालक तसेच विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रावरील आसन व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर सोमवारी पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली.