नाशिक : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने पाच पोलिसांना निलंबित केले असून इतरांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शासनाच्यावतीने दिल्यानंतर परभणी ते मुंबई पदयात्रा शनिवारी नाशिक येथे स्थगित करण्यात आली.
परभणीत सुरू असलेल्या आंदोलनात आंबेडकरी चळवळीतील अनुयायांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे १७ जानेवारी रोजी पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली होती. नाशिकजवळील पांडवलेणी येथे पोहोचलेल्या मोर्चेकऱ्यांशी शनिवारी सायंकाळी परभणीच्या पालकमंत्री बोर्डीकर आणि भाजपचे आमदार धस यांनी चर्चा केली. मोर्चेकऱ्यांनी केलेल्या १५ पैकी अनेक मागण्या मान्य झाल्या असून शासकीय कारणास्तव विलंब होत असल्याचे बोर्डीकर यांनी माध्यमांना सांगितले. कायदा सुव्यवस्था राखणे पोलिसांचे काम आहे. त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल. संबंधितांच्या नार्को चाचणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
धस यांनी आंदोलकांची १२ पोलिसांना निलंबित करण्याची मागणी असल्याचे सांगितले. शासनाने पाच पोलिसांना निलंबित केले असून पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये म्हणून प्रशासनाला दोन्ही बाजुने विचार करावा लागतो. पायी चालणे अतिशय क्लेशकारक असून मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या गेल्या आहेत. इतर मागण्यांची पूर्तता महिनाभरात व्हावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल. मोर्चेकऱ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याचे आमदार धस यांनी सांगितले. मोर्चेकऱ्यांच्यावतीने आशिष वाकोडे यांनी चित्रफितीत दिसणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे, दंगलीशी संबंध नसणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा आग्रह धरला. सरकारच्या आश्वासनानंतर तुर्तास आंदोलन स्थगित करत असून महिनाभरात उर्वरित मागण्या मान्य न झाल्यास नाशिकहून मुंबईला पुन्हा पदयात्रा काढली जाईल, असे त्यांनी सूचित केले.