Nashik Kasara Ghat Accident: नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात टँकर २०० फूट खोल दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू तर, तीन जण जखमी झाले. भरधाव टँकर रस्त्यालगतच्या लोखंडी जाळ्या तोडून दरीत गेला. मृत आणि जखमी हे सिन्नर तसेच संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहेत.
रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घाटातील बलगर पॉइंटजळ हा अपघात झाला. नाशिकहून मुंबईकडे जाणारा कसारा घाटातील नवीन मार्ग तीव्र उताराचा आहे. दुपारी भरधाव टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. टँकर दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह गस्ती पथक, आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पावसात दरीतील मदतकार्यात अडचणी आल्या. क्रेनही मागविण्यात आली. शर्थीने प्रयत्न करून मृत व जखमींना बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा : नाशिक: रक्षाबंधनसाठी सुट्टीच्या दिवशीही टपाल कर्मचारी कामावर
अपघातात विजय घुगे (६०,), आरती जायभावे (३१), सार्थक वाघ (२०), चालक योगेश आढाव (५०) आणि रामदास दराडे (५०) यांचा मृत्यू झाला. अक्षय घुगे ((३०), श्लोक जायभावे (पाच वर्ष), अनिकेत वाघ (२१) या जखमींना रुग्णवाहिकेने कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली. जखमींना दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. दरीत टँकरचे सर्व भाग विखुरले गेले असून त्याची ओळख पटणेही अवघड झाले आहे. अपघातात मृत व जखमी सिन्नर तालुक्यातील नेरळ आणि संगमनेर तालुक्यातील निमोण येथील आहेत. चालक कोपरगावचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. मदत कार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक, मृत्यूंजय दूत, लतिफवाडी येथील क्रेनचालक, महामार्ग पोलीस आणि कसारा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शर्थीने प्रयत्न केले.