नाशिक – शेताच्या बांधावर आढळणाऱ्या, औषधी गुणधर्म असलेल्या, पण दुर्लक्षित कवठ झाडाच्या फळापासून लोणचे, कूट, पोळी, चटणी, आईस्क्रिम, मिठाई, जाम, जेली, आरोग्यदायी पेय, बिस्किट, सरबत, रबडी, असे थोडेथोडके नव्हे तर, तब्बल २५ पदार्थांची निर्मिती करुन शहरातील के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी ‘कपिथ्या’ उपक्रमातून त्यास व्यावसायिक दृष्टीकोन देण्याची मुहूर्तमेढ रोवली आहे.

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हा उपक्रम सुरू करण्यात आला. कवठ हे जंगली फळ मानले जाते. औषधी गुणधर्म, आयुर्वेदिक उपयोग आणि पौष्टिकता यामुळे प्राचीन काळापासून त्याचे महत्व आहे. परंतु, या फळाकडे अद्याप व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले गेले नव्हते. विद्यार्थ्यांनी कवठाच्या उत्पादनावर संशोधन करून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. आणि या फळाच्या व्यापारीकरणाला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. कवठाच्या सालीचा उपयोग करून त्यांनी सुशोभित व गृहोपयोगी वस्तू तयार केल्या आहेत.

या उपक्रमात नवनाथ आहेर, प्रतीक्षा वाघ, वैष्णवी विभांडिक, जयश्री महाले आणि निकम श्रावणी हे विद्यार्थी सहभागी आहेत. त्यांना प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, डॉ. नितीन गायकवाड, वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. के. एम. खालकर आदींचे मार्गदर्शन मिळाले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या संकल्पनेला पाठिंबा देत त्यास पेटंटच्या माध्यमातून संरक्षित करण्याचा मानस व्यक्त केला. महाशिवरात्र वा तत्सम उपवासाच्या दिवशी कवठ बाजारात विक्रीसाठी दृष्टीस पडते. अनेकदा हे फळ शेताच्या बांधावर झाडावरुन पडून खराब होऊन सडून जाते. या उपक्रमातून शेतकऱ्यांना त्याची योग्य किंमत मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लागण्याची अपेक्षा आहे.

कवठ फळापासून विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच विविध पदार्थ तयार केले. त्यामध्ये पारंपरिक चवीच्या लोणच्यापासून ते वाइन निर्मिती शक्य असल्याचे समोर आले. गोड-तिखट चटणी, वेगळ्या चवीची पाणीपुरी, चाट, चॉकलेट, कढी, रबडी, शिरा, भेळ, आईस्क्रीम, मिठाई, कूट, अर्क, वडी आदी पदार्थांचा समावेश आहे. पूर्वी विभागाने या फळातील पौष्टिक मूल्यांची तपासणी केली होती. कवठाची मागणी कायमस्वरुपी असायला हवी, या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांनी हा उपक्रम हाती घेतला, असे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. खांडबहाले यांनी सांगितले.

Story img Loader