नाशिक – आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिककरिता २७ एमएलडी (मेगालिटर) आणि त्र्यंबकसाठी आठ एमएलडी पाणी देण्याची मागणी महापालिकेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली असून नगरोत्थान विभागाकडे तसा प्रस्ताव देण्यात आला आहे.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत कुंभमेळा नियोजन बैठक झाली. कुंभमेळ्यात शाहीस्नान तसेच अन्य पर्वणींसाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या काळात भाविकांची तरंगती संख्या तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील लोकसंख्या लक्षात घेता पिण्यासाठी तसेच वापरण्यासाठी पाणीप्रश्न निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने नाशिकसाठी २७ एमएलडी अधिक पाणी लागणार आहे.
मुकणे धरणातून पाणी आणून विल्होळी येथे संचय करण्यात येणार आहे. यासाठी ४०० कोटी खर्च आहे. यासंदर्भात महापालिकेच्या वतीने नगरोत्थान विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हीच परिस्थिती त्र्यंबक येथे उद्भवू शकते. नगरपालिकेच्या वतीने आठ एमएलडी पाण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्हीची मागणी करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीच्या वतीने २०० आणि ११०० महाआयटीच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत सद्यस्थितीत ते कार्यान्वित नाहीत. काही तांत्रिक अडचणी असून लवकरच ते कार्यान्वित करण्यात येतील. यासह वेगवेगळ्या मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.