नाशिक : मराठीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता आपण प्रत्यक्षात काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करणारी मंडळी विरळाच. मुलांना कुसुमाग्रजांसारख्या दिग्गजांची माहिती व्हावी, मराठीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने कार्यरत कुसुमाग्रज मराठी विचार मंचने मराठी उपासक पदवी हा उपक्रम सुरु केला आहे. दीड महिन्याच्या कालावधीत पाच हजार शालेय विद्यार्थी या पदवीने सन्मानित झाले आहेत. पुढील १० दिवसांमध्ये त्यात अजून पाच हजार विद्यार्थ्यांची भर पडेल.

मराठी भाषा गौरव दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहू नये, तर मराठी भाषेचा रोजच गौरव होण्याची सध्याची गरज आहे. जिल्ह्यातील काही मराठी आणि कुसुमाग्रजप्रेमींनी मराठी भाषा प्रसाराच्या ध्येयाने एकत्र येत पाच वर्षांपूर्वी कुसुमाग्रज मराठी विचार मंचची स्थापना केली. मंचतर्फे इतर कार्यक्रम घेत असतानाच शाळांमधील चौथी, पाचवीच्या अनेक विद्यार्थ्यांना मराठी धड वाचता येत नाही, त्यांना कुसुमाग्रजही फारसे माहीत नाहीत, हे लक्षात आल्यावर मंचने या विद्यार्थ्यांसाठी मराठी उपासक पदवी हा उपक्रम सुरु करण्याचे ठरविले. त्यासाठी असे होते कुसुमाग्रज ही पुस्तिका तयार केली. पुस्तिकेत कुसुमाग्रजांविषयीची सर्व माहिती अगदी साध्या भाषेत देण्यात आली. पुस्तिकेच्या पाच हजार प्रती तयार करण्यात आल्या. मराठी उपासक पदवीसाठी ज्या शाळांमध्ये मंचतर्फे परीक्षा घेतली जाते, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना या पुस्तिकांचे वाटप केले जाते. चौथी ते सहावी आणि सातवी ते आठवी या दोन गटांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. पहिल्या गटासाठी ५० तर दुसऱ्या गटासाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका असते. १५ दिवसांच्या अभ्यासानंतर परीक्षा त्या त्या शाळांमध्येच घेतली जाते. आतापर्यंत जनता सेवा मंडळ, नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम, मानवधन या संस्थांच्या शाळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना मराठी उपासक पदवीने सन्मानित करण्यात येते. दीड महिन्यात पाच हजार विद्यार्थ्यांनी हा मान मिळवला असून त्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात येते. तसेच कुसुमाग्रज मराठी विचार मंचतर्फे अशा शाळा आणि मुख्याध्यापकांना आभारपत्र देण्यात येते.

मंचच्या या उपक्रमात संस्थापक अध्यक्ष सतीश बोरा, सचिव सुभाष सबनीस, खजिनदार जयप्रकाश मुथा, विश्वस्त दिलीप बारावकर, सुहासिनी वाघमारे तसेच उपेंद्र वैद्य यांचा विशेष पुढाकार आहे. असे होते कुसुमाग्रज ही पुस्तिका अलका कुलकर्णी, आरती डिंगोरे, रंजना भंडारी, नंदकिशोर यांनी तयार केली आहे.

कुसुमाग्रज मराठी विचार मंचतर्फे शालेय विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांची माहिती मिळावी, मराठी भाषेचा प्रसार व्हावा, यासाठी मराठी उपासक पदवी परीक्षा हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमासाठी मंचला पुरेशा मनुष्यबळाची उणीव आणि आर्थिक टंचाई जाणवते. यासाठी सर्वांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे.

सतीश बोरा (संस्थापक अध्यक्ष, कुसुमाग्रज मराठी विचार मंच)

Story img Loader