नाशिक : तालुक्यातील माडसांगवी येथील जवळपास ५० एकर वडिलोपार्जित जमीन बनावट दस्तावेज तयार करून हडपल्याचा आरोप जागा मालकांनी केला आहे. पोलीस तक्रार घेत नाहीत, उलट आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. राज्यातील एका मंत्र्याचा या व्यवहाराशी संबंध आहे. त्यामुळे पोलिसांसह शासकीय यंत्रणा त्यांना मदत करीत असून याची शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी संबंधितांनी केली आहे. माडसांगवी येथील जमिनीच्या विषयावर ॲड. अशोक अहिरे यांच्यासह जागा मालक रवींद्र पेखळे, परशुराम पेखळे, सुनील पेखळे, दत्तात्रय पेखळे आदींनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी मंत्री आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले. मौजे माडसांगवी येथील सर्व्हे क्रमांक. २३, २४, २९, ३१/१, ३१/२, ३२, ३३/अ/१, ३३/अ/२ या मिळकती आमच्या वडिलोपार्जित मालकीच्या आहेत. त्याचा गट क्रमांक १३ हा झाला आहे. या जमिनी पडीत होत्या. या ठिकाणी गुरे चरत असत. आजही ही जमीन पडीत आहे.
गावातील त्रयस्थ व्यक्ती व इतरांनी बनावट दस्तऐवज तयार करुन मिळकतीवर त्यांची नावे लावून घेतली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तींविरोधात फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. तसेच सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीचे आदेश दिले. असे असतानाही संबंधित त्रयस्थ व्यक्तींनी आमची मिळकत भारत नामक एका कंपनीला विकली. त्या कंपनीकडून नंतर अन्य एकाने ती घेतली. या व्यवहाराशी सत्ताधारी मंत्र्याचा संबंध आहे. मंत्र्याने बेनामी व्यवहारातून संबंधिताच्या नावे ती जमीन खरेदी केल्याचा आरोप ॲड. अहिरे यांनी केला.
पोलिसांकडून भूमाफियांना मदतीचा आरोप
पोलिसांना सर्व कागदपत्रे आणि न्यायालयाचे निकाल देऊनही ते संशयितांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी या प्रकरणातील भूमाफियांना मदत करण्यासाठी जमीन मालकांवर आणि वकिलांवर कारवाई करत असल्याचा आरोप ॲड. अहिरे आणि जागा मालकांनी केला. फसवणुकीने आमची मिळकत हडप केल्याची तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलीस आयुक्तांकडे दाद मागूनही दखल घेतली नाही, अशी तक्रार संबंधितांनी केली. या संदर्भात पोलिसांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.