नाशिक : डोंगर-दऱ्यांमधून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात रस्त्यावर गुरुवारी दुपारी दरड कोसळली. मोठे दगड रस्त्यावर आले. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जिवित वा वित्तहानी झाली नाही. दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याची माहिती तहसीलदार अभिजित बारावकर यांनी दिली.
चार ते पाच दिवसांपासून इगतपुरीत संततधार सुरू आहे. भावली धरण परिसरात डोंगरावरून कोसळणारे धबधबे बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. महामार्गाकडून भावली धरणाकडे जाणारा रस्ता पुढे कुरुंगवाडी व परिसरातील गावांकडे जातो. याच मार्गावर दुपारी एक वाजता दरड कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याबरोबर मोठे दगड रस्त्यावर आले. यावेळी त्या भागातून कुठलेही वाहन मार्गस्थ होत नसल्याने अनर्थ टळला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील हा मार्ग आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर तालुकास्तरीय यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बांधकाम विभागाला दरड तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे तहसीलदार अभिजित बारावकर यांनी सांगितले. दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झालेली नाही. एका बाजूने वाहतूक सुरू आहे. रस्त्यावर आलेले मोठे दगड हटवून वाहतूक लवकरच सुरळीत केले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा…नाशिक : महावितरणच्या भोंगळ कारभारावर उद्योजक संतप्त, कार्यकारी अभियंत्याकडून दिलगिरी
पावसामुळे बुधवारी सायंकाळी भावली धरण तुडूंब भरले. मुंबई-नाशिक महामार्गापासून समीप असणाऱ्या या धरणावर शनिवार व रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होते. उत्साही पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने यंत्रणांना विविध पातळीवर खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.