लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : शहरातून मार्गस्थ होणाऱ्या नाशिक डावा तट कालव्याचा अक्षरश: कचरा कुंडीसारखा वापर होत आहे. परिणामी, वहन मार्गात अडथळे येऊन पाणी तुंबते. हे प्रकार रोखून वहनव्यय टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने शहरातील १२ किलोमीटरच्या कालव्यास बंदिस्त स्वरुप देण्याच्या सादर केलेल्या प्रस्तावावर वर्षभरापासून निर्णय झालेला नाही. हा कालवा बंदिस्त करून त्याचा सिंहस्थात रस्तासाठी वापर करता येईल, याकडे लक्ष वेधले जात आहे.
गुरुवारी सकाळी नाशिक डावा तट कालव्यात आवर्तन सोडण्यात आले. ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे वहन मार्गात अडथळे आले. तुंबलेले पाणी जाधव मळा भागात शिरले. रस्त्यावरून पाण्याचे पाट वहात होते. क. का. वाघ महाविद्यालयालगत कालव्यात पाणी तुंबले. परिणामी गंगापूर धरणातून सोडलेले आवर्तन थांबवावे लागले. तुंबलेले पाणी कपिला नदीत सोडून द्यावे लागले. शुक्रवारी कालव्यातील कचरा काढण्याचे काम जेसीबी आणि कामगारांच्या सहाय्याने हाती घेण्यात आले. सायंकाळपर्यंत ते पूर्णत्वास जाण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता इंद्रजित काकुस्ते यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा-नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी
कचऱ्यामुळे नाशिक डावा तट कालव्याच्या वहन मार्गात नेहमीच अडथळे येतात. आसपासच्या झोपडपट्ट्यांमधील लोकांकडून जुन्या गादी, कपडे वा तत्सम कचरा कालव्यात फेकला जातो. झाडाच्या फांद्या, मृत जनावरेही कधीकधी आढळतात. डावा तट कालव्याची शहरातील लांबी १२ किलोमीटर आहे. त्याचे बंदिस्त कालव्यात रुपांतर केल्यास वहनव्यय सरासरी २० टक्के कमी होईल. रब्बी व उन्हाळी हंगामात ३२० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होऊन बिगर सिंचन आरक्षणामुळे कालव्याच्या लाभक्षेत्रातील ८६०० हेक्टर तुटीपैकी १०४० हेक्टर सिचंन क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे. कॉक्रिटने १० मीटर रुंदीचा कालवा बंदिस्त केल्यास वहन मार्गातील अडथळे दूर होतील. पाण्याचा अपव्यय टळेल. यासाठी शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव अनिर्णित आहे.
आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यात मुलीसह आईची आत्महत्या
बंदिस्त कालव्यावर रस्ताही शक्य
नाशिक डावा तट कालव्यावर १० गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे. या गावांच्या ग्रामपंचायतींना दुषित पाणी पिण्यायोग्य अर्थात शुद्धीकरणासाठी मोठा खर्च करावा लागतो. सिमेंट कॉक्रिटने नाला बंदिस्त झाल्यास कालव्याच्या व्यवस्थापनाची गरज पडणार नाही. कालव्याची जागा जॉगिंग ट्रॅक व सायकल फेरीमार्गासाठी वापरता येईल. सिंहस्थ कुंभमेळ्यात बंदिस्त कालव्यावर रस्ता तयार करता येईल, याकडे पाटबंधारे विभागाकडून लक्ष वेधले जात आहे.