नाशिक : नाशिक शहरातील रविशंकर मार्ग परिसरात असलेल्या नैसर्गिक नाल्यांचे पुनर्रज्जीवन करण्याऐवजी रस्त्याच्या मध्यभागी बांधलेल्या कृत्रिम नाल्यावर लोखंडी जाळ्या टाकणे अनुचित असल्याची तक्रार करीत या कामास स्थगिती देण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या ठिकाणी झाडे लावली गेली होती. सहा महिन्यांनी ती हटवून नाला बांधला गेला. त्यामुळे रस्त्याचा आकार कमी झाल्याकडे स्थानिकांकडून लक्ष वेधले जात आहे.
या संदर्भात स्वप्नील गायकवाड यांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले. रविशंकर मार्गावरील नाल्यावर सध्या लोखंडी जाळ्या टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. या कामास मान्यता देताना सौंदर्यीकरणाचा कुठलाही विचार झाला नाही. यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होईल, अशी धास्ती त्यांनी वर्तविली. प्रस्तावित जाळ्या नाल्याच्या वरच्या भागात बसविण्यात येणार आहेत. त्या चोरीला जाऊन महापालिकेचे नुकसान होऊ शकते. या नाल्यातील अस्वच्छतेचा स्त्रोत परिसरातील अनधिकृत गोठ्यांमध्ये आहे. गोठेधारक गुरांच्या मलमूत्रांवर कुठलीही प्रक्रिया न करता नाल्यात सोडतात, अशी तक्रार त्यांनी केली. उच्च न्यायालयाने सर्व गोठे शहराबाहेर नेण्याचे आदेश दिलेले असूनही मनपा त्याकडे दुर्लक्ष करते.
हेही वाचा…इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता
परिसरातील नैसर्गिक नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आल्यामुळे त्या नाल्यांची मृतवत अवस्था झाली आहे. त्यांना पुनर्जिवित करण्याऐवजी रस्त्याच्या मध्यभागी बांधलेल्या कृत्रिम नाल्यावर लोखंडी जाळ्या टाकणे अनुचित व अतार्किक असल्याचे गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे.