नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाचे सलग दोनवेळा प्रतिनिधित्व करणारे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची संपत्ती पाच वर्षात केवळ सुमारे दोन कोटींनी वाढून ती १६ कोटींवर पोहोचली आहे. गोडसे कुटुंबाकडे साडेआठ लाख रुपये किंमतीचे २८० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक करणाऱ्या या कुटुंबावर साडेसहा कोटींचे कर्ज आहे.
महायुतीत गोडसे यांना उमेदवारीसाठी बराच संघर्ष करावा लागला. एकदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोडसे यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करुन अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या पत्रात संपत्तीचे विवरण दिले आहे. पाच वर्षांपूर्वी गोडसे पती-पत्नीकडे जेवढे सोने होते, तेवढेच आजही आहे. तेव्हा दोन मुलांकडील वाहने आणि दागिन्यांचा केलेला उल्लेख यावेळी वगळण्यात आला आहे. शेती आणि बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या गोडसे कुटुंबाकडे पाच वर्षांपूर्वी सहा कोटी ८२ लाखाची चल तर साडेसात कोटींची अचल संपत्ती होती. सद्यस्थितीत गोडसे यांच्याकडे आठ कोटी आठ हजाराची तर, पत्नीकडे दोन कोटी २९ लाखांची चल संपत्ती आहे.
हेही वाचा : डॉ. भारती पवार यांच्या मालमत्तेत दुप्पट वाढ
उभयतांकडे एक कोटींच्या तीन मोटारी आहेत. गोडसे दाम्पत्याकडील स्थावर मालमत्तेचे मूल्य सुमारे सहा कोटी इतके आहे. त्यांची अचल संपत्ती आधीच्या तुलनेत दीड कोटींनी कमी झाली आहे. अनेक संस्थांमध्ये गोडसे यांची गुंतवणूक आहे. त्यांच्या नावावर वडिलोपार्जित शेतजमीन, संसरी तसेच लामरोडला सदनिका, कार्यालये आहेत. गोडसे यांची सून भक्ती गोडसे यांनी डमी अर्ज सादर केला आहे. त्यावरून गोडसे यांचा मुलगा अजिंक्य याच्या नावे दोन कोटी नऊ लाखाची चल संपत्ती दिसून येते. भक्ती गोडसे यांच्या नावावर सुमारे २० लाखाची चल संपत्ती आहे.