नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे सिद्धेश्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्याकडे जवळपास दीड कोटींची संपत्ती असून त्यांच्यावर ९५ लाखाचे कर्ज आहे. ६२ ग्रॅम सोन्याचा मुलामा असणारे पावणे तीन लाखांचे सोन्याचे घड्याळ आणि साडेचार लाखाचे ५६ ग्रॅमचे दागिने त्यांच्याकडे आहेत.
नाशिक मतदारसंघात आधी अर्ज भरणाऱ्या शांतिगिरी महाराजांकडे तब्बल ३९ कोटींची संपत्ती आहे. त्या तुलनेत त्र्यंबकेश्वरच्या श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे महंत सिद्धेश्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्याकडे बरीच कमी संपत्ती आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महाराजांकडे एक कोटी २५ लाखाची चल संपत्ती आहे. यामध्ये सुमारे ५६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ६२ ग्रॅम सोन्याचा मुलामा असणाऱ्या घड्याळाचा समावेश आहे.
हेही वाचा : नाशिक: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले दोन दिवस
बस, जेसीबी, टेम्पो, दुचाकी, आयशर टेम्पो अशी २२ लाखाची पाच वाहने आहेत. स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती इंटरनॅशनल असोसिएशनचे संचालक म्हणून त्यांनी ४६ हजार रुपये शेअर्समध्ये गुंतवलेले आहेत. तर १६ लाख २५ हजार रुपये त्यांनी कर्जाऊ दिले आहेत. शहरात कामटवाडे येथे रो हाऊस त्यांनी खरेदी केले आहे. त्याची सध्याची किंमत सुमारे २१ लाख आहे. वाहने व तत्सम बाबींसाठी त्यांनी कर्ज घेतले आहे. त्यांच्यावर बँक, वित्तीय संस्था आणि अन्य संस्थांचे ९४ लाख ९५ हजाराचे दायित्व आहे.