लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेची आहे. या ठिकाणी पक्षाचा खासदार असल्याने जागेवर शिवसेनेचा दावा कायम असून जागा भाजपला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपकडून नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जात आहे. भाजपचे शहरात तीन आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा भाजपकडे घेण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून नेतृत्वाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर भुसे यांनी शिवसेनेच्या ताब्यातील जागा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निश्चितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील, असे भुसे यांनी नमूद केले.

आणखी वाचा-नाशिक : बाजार समिती संपामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

पक्षचिन्हाच्या अनावरणासाठी शरद पवार राजगडावर उपस्थित होते. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेचे भुसे यांनी समर्थन केले. राज ठाकरे जे बोलले ती वस्तुस्थिती आहे. काही तुतारी वाजविणारे कृती करत होते, आवाज प्रायोजित होता, असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, हे आपणालाही माहिती नव्हते. अचानक घडामोडी झाल्या आणि मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घोषित झाला. तेव्हा खासदार श्रीकांत शिंदे व आपण सोबत होतो. त्यांनाही तोपर्यंत याची कल्पना नव्हती, असे भुसे यांनी नमूद केले.