नाशिक : सर्वाधिक धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह सहा तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत अतिशय कमी पाऊस झाल्याची परिणती जुलैच्या मध्यापर्यंत जिल्ह्यातील धरणसाठा नऊ हजार ३४१ दशलक्ष घनफूट म्हणजे १४ टक्क्यांपर्यंत राहण्यात झाली आहे. गेल्या वर्षी जलसाठ्याचे हेच प्रमाण दुप्पटीहून अधिक १९ हजार ६३ दशलक्ष घनफूट (२९ टक्के) इतके होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाच्या हंगामाला सव्वा महिना होत असताना जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यात फारशी सुधारणा झालेली नाही. नऊ तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक तर, सहा तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पावसावर जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील जलसाठा उंचावत असतो. यंदा याच तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जलसाठा उंचावण्यास अपेक्षित हातभार लागला नाही. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या १५४५ दशलक्ष घनफूट म्हणजे २७ टक्के जलसाठा आहे. या धरण समुहाची त्र्यंबकेश्वर व परिसरातील पावसावर भिस्त असते. तिथेच पुरेसा पाऊस नसल्याने जलसाठा फारसा उंचावला नाही. मागील वर्षी याच काळात गंगापूरमध्ये ३३ टक्के जलसाठा होता. अन्य धरणांची फारशी वेगळी स्थिती नाही. इगतपुरीत कमी पर्यंन्यमानाची झळ अनेक धरणांना बसली आहे.

हेही वाचा…सुश्रुत प्रणालीमध्ये वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यात प्रथम

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार गंगापूर धरण समुहातील काश्यपीत पाच टक्के, गौतमी गोदावरी (१७ टक्के), आळंदी (दोन टक्के) असा जलसाठा आहे. इगतपुरी तालुक्यातील पावसावर अवलंबून असणाऱ्या दारणा धरणात ३३ टक्के, मुकणे (नऊ टक्के), भावली (४१), वालदेवी (१४), कडवा (२६) टक्के जलसाठा आहे. दिंडोरी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. तरीही पालखेड धरण समुहाची स्थिती फारशी सुधारलेली नाही. पालखेड धरणात १४ टक्के, करंजवण (१.८२), वाघाड (२.८७) असा जलसाठा आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूर (४.८२ टक्के), हरणबारी (नऊ), केळझर (१.९२), गिरणा (११.७५) पुनद (१३.७८) टक्के जलसाठा आहे.

हेही वाचा…आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी जिल्ह्यातून जादा बससेवा; प्रत्येक आगारातून २० अधिकच्या बस

सहा धरणे कोरडीच

पावसाअभावी ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, माणिकपूंज, भोजापूर व नागासाक्या ही धरणे आजही कोरडी आहेत. जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ पैकी सहा धरणे पूर्णत: कोरडीठाक आहेत. उर्वरित १८ धरणात एकूण नऊ हजार ३४१ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १० हजार दशलक्ष घनफूटने कमी आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik low rainfall in trimbakeshwar leads to water storage deficit in dams psg