नाशिक : शहरात महिलांना सुरक्षित वाहतुकीचा पर्याय आणि गरजू महिलांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करण्याच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या पिंक इ रिक्षा लवकरच राज्यातील १० शहरांसह नाशिक शहरात धावताना दिसणार आहेत. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबरोबर जाहीर झालेल्या या योजनेला तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला. अधिकाधिक महिलांनी पिंक रिक्षाचे सारथ्य करावे, यासाठी प्रयत्न केले जात असून पर्यटन विभागाची आई योजनाही या योजनेशी जोडण्यात येणार आहे.
महिला आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने मागील अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसह पिंक इ रिक्षा योजना आणली. साधारणत: नऊ महिने होऊनही योजनेने अद्याप गती घेतलेली नाही. जिल्ह्यात योजनेसाठी ९०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ६०० हून अधिक अर्ज मंजूर झाले. मे अखेर पिंक रिक्षा धावतील, असा अंदाज आहे. राज्य सरकार महिला सक्षमीकरण, त्यांना आर्थिकदृष्टया सबल करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र पर्यटन विभागाची आई आणि महिला व बाल कल्याण विभागाची इ-पिंक रिक्षा या योजनांना अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. ‘पिंक रिक्षा’ ही योजना गरीब महिलांना रोजगार आणि नोकरदारांसह अन्य महिलांना सुरक्षित वाहतूक साधनांची गरजही पूर्ण करेल. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये लवकरच महिलांकडून सारथ्य केल्या जाणाऱ्या गुलाबी इ-रिक्षा पहावयास मिळतील.
पहिल्या वर्षात पाच हजार गुलाबी रिक्षा रस्त्यावर धावतील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात किती रिक्षा रस्त्यावर आहेत, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या योजनेची विविध प्रदर्शने, जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिध्दी करण्यात आली. या योजनेंतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात आली. सध्या महिलांची बँक खाती संलग्न करणे तसेच कागदपत्रांची पूर्तता प्रगतीपथावर आहे. या अनुषंगाने स्थापन केलेल्या समितीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर लवकरच ५०० इ पिंक रिक्षा स्थानिक पातळीवर धावतील, असा विश्वास यंत्रणेकडून व्यक्त केला जातो.
रिक्षा खरेदीसाठी अनुदान
महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने ही योजना अंमलात आणण्यात आली. त्याअंतर्गत सरकार बेरोजगार महिलांना २० टक्के अनुदान देईल. जेणेकरून त्या रिक्षा खरेदी करू शकतील, एकूण खर्चाच्या १० टक्के रकमेची व्यवस्था त्यांना करावी लागेल. उर्वरित ७० टक्के रक्कम बँकेकडून कर्जाऊ स्वरुपात उपलब्ध होईल. या योजनेसाठी उमेदवार महाराष्ट्र राज्यात राहणे आवश्यक आहे. २० ते ४० वयोगटातील महिला तसेच आर्थिकदृष्टया साडेतीन लाखपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असावे.
इ पिंक रिक्षा योजनेस सद्यस्थितीत कमी प्रतिसाद आहे. वेगवेगळ्या माध्यमातून महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहचविण्याचा प्रयत्न करत आहोत. ही महिलांसाठी एक चांगली व्यवसायिक संधी असून ६०० हून अधिक महिला योजने अंतर्गत पात्र ठरल्या आहेत. पर्यटन विभागाची आई योजनाही या योजनेशी लवकरच जोडली जाणार आहे. मे अखेर पर्यंत महिलांचे प्रशिक्षण पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. सुनील दुसाने (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी)