नाशिक – पंचवटीतील हनुमान नगरातील महायुवाग्राममध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवातातंर्गत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा विभागामार्फत देशसेवा तसेच समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकांना तसेच स्वयंसेवी संस्थांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी २०२०-२१ वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या हस्ते करण्यात आले.
वैयक्तिक पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तर युवक संस्थांच्या पुरस्काराचे स्वरुप तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे होते. पुरस्कार्थींमध्ये महाराष्ट्रातील वैष्णवी गोतमारे (अकोला), विधी पलसापुरे (लातूर) आणि संस्थात्मक पुरस्कारात शक्ती विकास बहुद्देशीय संस्था (नाशिक) यांचा समावेश आहे.
हेही वाचा..निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्कीच कापू; येवल्यात छगन भुजबळांची पतंगबाजी
यावेळी प्रामाणिक यांनी, भारताने आज सर्वच क्षेत्रात विकासाचे पाऊल पुढे टाकले असून भारताचा जगात प्रभाव निर्माण झाला असल्याचे सांगितले. देशाप्रती सेवाभाव असणाऱ्या आणि समाज सेवेसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या १५ युवक आणि दोन संस्थांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील युवकांसाठी हा महोत्सव प्रेरणेचा स्त्रोत आहे. सक्षम युवा, समर्थ भारत या संकल्पनेतून देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शपथ घेवू या, असे आवाहन प्रामाणिक यांनी केले.
यावेळी युवा मंत्रालय संचालिका विनिता सूद, अवर सचिव धर्मेंद्र यादव, क्रीडा आयुक्त डॉ. सुहास धिवसे, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अर्जुन पुरस्कार विजेती धावपटू कविता राऊत यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
पुरस्कार्थी
वैयक्तिक पुरस्कार्थींमध्ये अधि दैव (गुरुग्राम, हरियाणा). अंकित सिंह (छत्तरपूर, मध्य प्रदेश), बिसाठी भरत (अनंतपुरम, आंध्र प्रदेश), केवल पावरा (बोटाद, गुजरात), पल्लवी ठाकुर (पठाणकोट, पंजाब), प्रभात फोगाट (झज्जर, हरियाणा), राम बाबू शर्मा (जयपूर, राजस्थान), रोहित कुमार (चंडीगड), साक्षी आनंद (पाटणा, बिहार), सम्राट बसाक (धलाई, त्रिपुरा), सत्यदेव आर्य (बरेली, उत्तर प्रदेश), वैष्णवी गोतमारे (अकोला, महाराष्ट्र), विधी पलसापुरे (लातूर, महाराष्ट्र), विनीशा उमाशंकर (तिरुवन्नामलाई, तमिळनाडु), विवेक परिहार (उधमपूर, जम्मू-कश्मीर) तर स्वयंसेवी संस्था पुरस्कार गटात शक्ती विकास बहुद्देशीय संस्था (नाशिक, महाराष्ट्र) आणि युनिफाईड रूरल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, थौबल, मणिपूर) यांचा समावेश आहे.
पुरस्काराचे स्वरुप काय ?
देशाप्रती सेवाभाव असणाऱ्या आणि समाज सेवेसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या १५ युवक आणि दोन संस्थांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैयक्तिक पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तर युवक संस्थांच्या पुरस्काराचे स्वरुप तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.