नाशिक – गोदावरी महाआरतीसाठी नदीकाठावर चौथरे व सुशोभिकरणाच्या कामास आक्षेप घेत विरोधात शनिवारी पुरोहित संघ, हिंदुत्ववादी संघटनांसह महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी गोदापात्रात उतरत आंदोलन केले. आंदोलकांनी बांधकाम विरोध दर्शविणारे विविध फलक हाती घेऊन घोषणाबाजी केली.

गोदावरी महाआरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यात संघर्ष सुरू आहे. वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर राज्य सरकारने गोदावरी महाआरती सुरू केली आहे. त्यासाठी शासकीय रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची स्थापना करण्यात आली. सुमारे ११ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. महाआरतीची जबाबदारी या समितीकडे देण्यास पुरोहित संघाने प्रारंभापासून विरोध केला आहे. उभयतांमधील वादामुळे सध्या गोदावरी काठावर पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यामार्फत स्वतंत्रपणे महाआरत्या केल्या जात आहेत. महाआरतीसाठी गोदाकाठावर चौथरे उभारणी व सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहे. या कामास न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीचीही परवानगी घेतलेली नसल्याची पुरोहित संघाची तक्रार आहे. याआधी पुरोहित संघाने त्यास विरोध दर्शवून ती बंद पाडली होती. या कामास विरोध दर्शविण्यासाठी रामकुंड येथे पुन्हा ठिय्या आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा – नाशिक, मालेगावात डेंग्यू नमुने तपासणी प्रयोगशाळेचा प्रस्ताव, चाचणीसाठी नवीन संच उपलब्ध

हेही वाचा – इंडियन बँकेच्या अंबड शाखेवर दरोडा

आंदोलक ‘ठेकेदार हटवा, गंगाघाट वाचवा’, ‘गोदा बचाव, मंदिर बचाव’, गोदावरी प्रदूषण मुक्त झालीच पाहिजे, अशा आशयाचे फलक घेऊन सहभागी झाले. माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, भक्तीचरणदास महाराज, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, उद्धव पवार, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, प्रतीक शुक्ल व स्थानिक व्यावसायिक आंदोलनात सहभागी झाले होते. स्मार्ट सिटी कंपनीने गोदाघाट परिसरात केलेल्या कामामुळे वारसा स्थळांची मोडतोड झाल्याची तक्रार आंदोलकांनी केली.