लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत काट्याची टक्कर होणार असल्याचे मतदानोत्तर चाचण्यांमध्ये उघड झाले असले तरी दोन्ही गटांचे उमेदवार आपापल्या विजयाची खात्री बाळगून आहेत. चाचण्यांचे कल पाहून काहींना हायसे वाटले तर, काहींनी त्यात फारसे तथ्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

कांदा निर्यात बंदीमुळे गाजलेल्या दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात कडवी लढत होत आहे. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभा घेतली होती. काही चाचण्यांमध्ये भगरे तर, काही चाचण्यांमध्ये डॉ. पवार यांना झुकते माप दिले गेले. दिंडोरीतील जनता पाच वर्षात आम्ही केलेली कामे, विकासाच्या दृष्टीने आणलेल्या प्रकल्पांना आशीर्वाद देईल, असा विश्वास डॉ. पवार यांनी व्यक्त केला. करोना काळात सरकार आरोग्य व्यवस्था, प्रतिबंधक लस पुरवठ्यात कुठेही कमी पडले नाही, असा दावा त्यांनी केला. भगरे यांनी केंद्र सरकारची शेतकरीविरोधी धोरणे, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष याचा राग प्रचारावेळी शेतकरी व सामान्यांमध्ये दिसत होता, असे सांगितले. लोक स्वयंस्फुर्तीने बाहेर पडल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. मतदानोत्तर चाचणीचे कल सत्ताधाऱ्यांविरोधातील कौल दर्शवित असल्याचा दाखला भगरे यांनी दिला.

आणखी वाचा-कृत्रिम बुध्दिमत्तेचा दुरुपयोग टाळण्यासाठी नियमनाची गरज, शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत विवेक सावंत

दिंडोरीप्रमाणे नाशिक मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) हेमंत गोडसे आणि शिवसेना (ठाकरे गट) राजाभाऊ वाजे यांच्यात लढत होत आहे. मतदानोत्तर चाचण्यांसाठी प्रत्येकाचे वेगवेगळे सर्वेक्षण असते. ज्यांनी या चाचण्या केल्या, त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून माहिती घेतली. महायुतीने सर्व विधानसभा मतदार संघात सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार सिन्नर वगळता उर्वरित पाचही विधानसभा मतदार संघातून महायुतीला आघाडी मिळेल. नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या ठिकाणी सर्वाधिक आघाडी मिळणार असल्याचा दावा गोडसे यांनी केला. वाजे यांनी मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज पाहून हलके वाटायला लागल्याची भावना व्यक्त केली. मतदानानंतर आपण संपूर्ण मतदार संघातील आढावा घेतल्यावर जे सकारात्मक चित्र समोर आले, तसाच मतदानोत्तर चाचणीत कल दिसत आहे. परंतु, या चाचण्या म्हणजे निकाल नाहीत. ठराविक नमुन्यातून निष्कर्ष काढले जातात, असेही वाजे यांनी नमूद केले.