नाशिक : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळात नसणे हा मोठा अपमान नियतीला कदाचित छगन भुजबळ यांचा करायचा होता. त्यामुळे येवल्यात ते विजयी झाले. सत्तेत येऊनही दुसऱ्या माणिकरावांच्या हातून त्यांचा पराभव झाला, अशी टीका येवल्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार माणिकराव शिंदे यांनी केली आहे.
राज्याच्या कृषिमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर माणिक कोकाटे हे रविवारी प्रथमच शहरात आले. शासकीय विश्रामगृहात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कोकाटे यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची रिघ लागली होती. मंत्रिमंडळात डावलले गेल्याने नाराज छगन भुजबळ यांच्याकडून पक्ष नेतृत्वाला लक्ष्य करण्यात आले. यावरून अजित पवार गटाचे मंत्री कोकाटे यांनी भुजबळ यांना खडेबोल सुनावले.
हेही वाचा…येवला बाजार समितीत शेतकऱ्यांकडून लिलाव बंद, मनमाड रस्त्यावर ठिय्या
दुसरीकडे कोकाटेंचे अभिनंदन करण्यास आलेले शरद पवार गटाचे नेते माणिकराव शिंदे यांनीही भुजबळांना चिमटे काढले. येवला मतदारसंघात भुजबळांविरोधात ते पराभूत झाले होते. कोकाटेंचे अभिनंदन केल्यानंतर शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या भेटीत कोणतेही राजकारण नाही. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही परस्परांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सूचित केले. कोकाटेंना साडेअठरा वर्षानंतर मंत्रिपद मिळाले याचा आपणास मनस्वी आनंद झाला. भुजबळांचा माझ्या हातून पराभव होण्यापेक्षा राज्यात सत्ता येऊन त्यांना मंत्रिपद न मिळणे याला नियतीने जास्त महत्व दिल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. भाजपही भुजबळांना घेईल की नाही, हा प्रश्न असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.