महापौरांच्या निर्णयानंतरही छाननी आणि पडताळणी सुरू

नाशिक : शहरातील हजारो मालमत्तांवर दंडात्मक करआकारणीसाठी बजावलेल्या नोटिसा रद्द करण्याची घोषणा गेल्या महिन्यात महापौर रंजना भानसी यांनी केली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. बजावलेल्या नोटिसांबाबत प्रशासन छाननी, फेरपडताळणी करीत आहे. वार्षिक करयोग्य मूल्य निश्चितीबाबत दोन वेळा ठराव झाले. त्यावर प्रशासन अभ्यास करीत असून त्यातून सकारात्मक तोडगा कसा काढता येईल, यावर सर्व घटकांशी चर्चा करण्यात येणार आहे.

लोकशाही पंधरवडय़ानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत महापौर रंजना भानसी आणि पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दंडात्मक करआकारणीच्या नोटिसांविषयी उपस्थित प्रश्नावर आयुक्तांनी छाननी, पडताळणीचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी सुमारे ५९ हजार मालमत्तांना हजारो, लाखो रुपयांची नोटीस बजावली गेल्याने मालमत्ताधारकांमध्ये घबराट पसरली. डिसेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत या नोटीस रद्द करण्याची मागणी झाली होती. तेव्हा घरपट्टी विभागाने सर्वेक्षण सदोष असल्याची कबुली दिली होती. या घटनाक्रमाची दखल घेत महापौर रंजना भानसी यांनी मालमत्ता करासंबंधी बजावलेल्या नोटिसा रद्द करण्याचे निर्देश दिले. सर्वेक्षणाची वैधता तपासून फेरसर्वेक्षण करावे, असेही सूचित केले. नोटिसांची टांगती तलवार अद्याप दूर झालेली नाही. या संदर्भात १० हजार मालमत्ताधारकांनी हरकती नोंदविल्या आहेत. त्यात ७०० ते ८०० झोपडपट्टीधारकही आहेत. चार हजार प्रकरणांची फेरपडताळणी सुरू आहे. २७ हजार मिळकती अनधिकृत आहेत की नाहीत, याची पालिकेतील दस्तावेज तपासून छाननी केली जात असल्याचे गमे यांनी सांगितले. १ एप्रिलपासून करयोग्य मूल्य लागू होतात. इमारतीतील मोकळी जागा, वाहनतळ आदींवर करआकारणीचा गेल्या वेळी अंतर्भाव झाला. या संदर्भात सत्ताधाऱ्यांनी दोन वेळा ठराव केले आहेत. यावर प्रशासन अभ्यास करीत आहे. पालिकेचे उत्पन्न, पदाधिकाऱ्यांची मते, स्थिती आदींची व्यवहार्यता तपासून सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे गमे यांनी सांगितले.

खासगी रुग्णालये, व्यावसायिक, व्यापारी संस्था आदींना अग्निसुरक्षा प्रतिबंधक उपाय बंधनकारक आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये आगीच्या दुर्घटना वाढत आहेत. शहरातील आस्थापनांनी आग प्रतिबंधक उपायांकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘महाकवी कालिदास’च्या त्रुटी दूर होणार

सुमारे १० कोटी रुपये खर्चून नूतनीकरण झालेल्या महाकवी कालिदास कला मंदिरातील त्रुटी दूर करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या कामावर नव्याने कोणताही खर्च केला जात नसल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. मध्यंतरी कला मंदिरातील त्रुटींबाबत नाटय़ क्षेत्रातील मंडळींनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन आवश्यक ती कामे केली जात आहेत. कला मंदिराच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी खासगी संस्थेकडे सोपविण्यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील. प्रयोगांची तिकीट नोंदणी पूर्णत: ऑनलाइन करण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक कार्यक्रमांसाठी भाडय़ात २५ टक्के सवलत दिली जाते. तो अधिकार आयुक्तांना आहे. या अधिकाराचा वापर करून आवश्यक त्या कार्यक्रमास भाडय़ात सवलत दिली गेल्याचे गमे यांनी सांगितले.

Story img Loader