नाशिक : मुसळधार पावसात शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाची दुरावस्था समोर आली आहे. उड्डाण पुलावरील पाईप खराब झाल्यामुळे सेवा रस्त्यांवर जलधारा कोसळतात. पाण्याचे तळे निर्माण होते. महामार्गाच्या देखभाल, दुरुस्तीवर प्रचंड खर्च होत असताना अशी दुरवस्था होण्याचे कारण काय, असा प्रश्न करीत आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली आहे.
अलीकडेच शहरात दमदार स्वरुपात पाऊस झाला. त्यावेळी या उड्डाण पुलाची दुरवस्था समोर आली. अनेक ठिकाणी पुलावरील पाईप खराब झालेले आहेत. त्यामुळे जलधारा थेट सेवा रस्त्यांवरील वाहनधारकांवर पडतात. इंदिरानगरच्या भुयारी मार्गात पावसाच्या पाण्याने तळे निर्माण झाल्याचे समोर आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीची ही कामे का करण्यात आली नव्हती, असा प्रश्नही फरांदे यांनी प्रकल्प संचालकांना विचारला.
हेही वाचा : बबन घोलप यांचा उपनेतेपदाचा राजीनामा; ठाकरे गटाला धक्का, आज उद्धव ठाकरेंशी चर्चा
मुंबईत नाशिकपेक्षा जास्त पाऊस असताना नाशिकच्या रस्त्याची दुरावस्था होण्याची कारणे शोधून काढण्यासाठी चौकशीची गरज आहे. उड्डाण पुलाचे सर्व पाईप बदलून मोठ्या व्यासाचे पाईप टाकण्याची आवश्यकता त्यांनी मांडली. याबाबत आठ दिवसांत कार्यवाही करावी आणि महामार्ग दुरावस्थेबाबत लेखी अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली. याबाबत मुदतीत कार्यवाही न झाल्यास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा फरांदे यांनी दिला आहे.