नाशिक – महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी दिवसातील कित्येक तास कार्यालयातून अंतर्धान पावत असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन आता संबंधितांची दैनंदिन उपस्थिती आणि कामकाजावर इ हालचाल (मुव्हमेंट) कार्यप्रणालीद्वारे लक्ष दिले जाणार आहे. या प्रणालीची सोमवारपासून काटेकोरपणे अमलबजावणी करण्याचे निर्देश प्रभारी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाच्या येण्या-जाण्याच्या वेळेबाबत नोंद ठेवण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली वापरली जाते. तथापि, बहुतांश वेळा विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामांच्या पाहणीसाठी वेगवेगळ्या भागात जात असतात. अशा प्रकारे कार्यालयातून बाहेर पडताना विभागप्रमुख अथवा कार्यालयीन वरिष्ठांना पूर्वकल्पना देणे आवश्यक असते. मात्र तसे घडत नाही. पूर्वसूचना न देता अनेकजण कार्यालयाबाहेर फिरत असल्याचे उघड झाले आहे. ही गंभीर बाब असून कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी असल्याचे गमे यांनी सूचित केले आहे.

हेही वाचा – मनमाड : गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत करण्याचा रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे सामान्य नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. महापालिकेत नागरिकांसाठी दुपारी साडेतीन ते साडेपाच ही वेळ निश्चित केलेली आहे. या काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात थांबणे अपेक्षित असते. पण कार्यालयीन कामाच्या नावाखाली अनेकदा ते गायब असतात. नागरिकांना अधिकारी, कर्मचारी भेटत नाही. नाहक खेटे घालावे लागतात. त्यामुळे प्रशासनाने माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित केलेल्या इ हालचाल (मुव्हमेंट) या अद्ययावत पद्धतीने प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था केली आहे. यापुढे मनपातील अधिकाऱ्यांना स्वत:च्या कार्यालयाबाहेर कुठल्याही कर्तव्यासाठी जायचे असल्यास त्यांना प्रथम त्याबाबतची नोंद या कार्यप्रणालीत करावी लागणार आहे.

हेही वाचा – श्री सप्तश्रृंगी देवीच्या मंदिर सभामंडप जीर्णोद्धार प्रकल्पासाठी ११ लक्ष देणगी अर्पण

कार्यप्रणालीच्या वापराची माहिती सर्व कार्यालयांना देण्यात येणार आहे. सोमवारपासून कार्यालयीन उपस्थितीबाबत इ हालचाल कार्यप्रणालीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश गमे यांनी दिले. मुख्यालयातील सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुखांनी आपापल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या विनाकारण बाहेर बागडण्यास चाप लागण्याची अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik mnc employees are restricted from going outside during office hours ssb