नाशिक : वाहतूक समस्या, वाहनतळ, ध्वनिप्रदूषण यांसह काही वैयक्तीक स्वरूपातील तक्रारींचा भडिमार पोलिसांच्या वतीने आयोजित पोलीस दरबार कार्यक्रमात नागरिकांकडून करण्यात आला. विशेष म्हणजे पोलीस स्वत: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेत असताना नागरिक मात्र पुढे येण्यास टाळाटाळ करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक पोलीस दलाच्या वतीने १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस दरबार प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय घेण्यात येत आहे. बुधवारी तिसरा पोलीस दरबार जुने नाशिक, पंचवटीसह अन्य पोलीस ठाण्यांमध्ये आयुक्त, उपायुक्त, निरीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडला. काही ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तर, काही ठिकाणी पोलिसांना नागरिकांची प्रतिक्षा करावी लागली.

याविषयी उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी आपल्या उपस्थितीत झालेल्या पंचवटीतील पोलीस दरबारास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. बऱ्याच तक्रारी या वाहनतळ, वाहतूक समस्या, ध्वनिप्रदूषणाशी संबंधित होत्या. काहींनी घरात चोरी होऊन काही दिवस झाले असतानाही सामान अद्याप मिळाले नसल्याची तक्रार मांडली. काहींनी वैयक्तीक तक्रारी केल्या. काही नागरिकांनी वाहतूक समस्येविषयी उपाय सुचविल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जुने नाशिक परिसरात पोलीस दरबार उपक्रमात उपस्थित होते. या उपक्रमासाठी त्यांनी एक तास दिला असतानाही मोजकेच नागरिक त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आले.

वास्तविक, या ठिकाणी अतिक्रमण, रात्री उशीरापर्यंत सुरू असणारी दुकाने, वाढलेली गुन्हेगारी याविषयी तक्रारी येणे अपेक्षित असतांना दुचाकी चोरी किंवा वैयक्तीक स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या. पोलीस आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित नाशिकचा अनुभव मिळावा, यासाठी पोलीस प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्न करत असतांना नागरिक मात्र समस्या मांडण्यास किंवा उपाय सुचविण्यासाठी पुढे येण्यास कचरत आहेत. तिसरा पोलीस दरबार असूनही नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे दिसले. नागरिकांना विश्वास देण्यात पोलीस प्रशासन कमी पडत आहे की, गुंडांच्या दहशतीमुळे नागरिक पुढे येत नाहीत, याविषयी संभ्रम आहे.