जलसाठय़ाची स्थिती चिंताजनक
दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले असले तरी तो रिमझिम स्वरूपात आहे. पावसाने आशा पल्लवित झाली असली तरी मागील चोवीस तासांत केवळ ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाला सुरुवात झाली असताना वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत केवळ ४५ टक्के पाऊस झाला.
गतवर्षी हे प्रमाण ७५ टक्के होते. पावसाअभावी धरणांची स्थिती बिकट असून गंगापूर, पालखेड व गिरणा धरण समूहात केवळ ३१ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची वाटचाल दुष्काळाच्या दिशेने सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे.
बुधवारी जिल्ह्य़ातील काही भागात पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जवळपास दीड महिना अंतर्धान पावलेल्या पावसाचे पुनरागमन संथपणे झाले. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व चांदवड येथे केवळ शिडकावा झाला. गुरुवारी ढगाळ वातावरण असले तरी अधूनमधून रिमझिम सरी वगळता फारसा जोर दिसला नाही. गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण पाच हजार मिलिमीटरने कमी झाले आहे.
आकडेवारीचा विचार केल्यास जिल्ह्य़ात सरासरी ४५ टक्केच पाऊस झाला आहे. त्यात नाशिक व इगतपुरीमध्ये सर्वाधिक म्हणजे ६२ टक्के, दिंडोरी ३७ टक्के, पेठ ३९, त्र्यंबकेश्वर ३८, मालेगांव ५५, नांदगाव १६, चांदवड ४९, कळवण ३१, बागलाण ५१, सुरगाणा ४४, देवळा २९, निफाड येथे ३८, सिन्नर येथे ४३ आणि येवला येथे ३३ टक्के पावसाची नोंद आहे.
आतापर्यंत जिल्ह्य़ात एकूण ७२०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी हे प्रमाण १२ हजारांहून अधिक होते.
पावसाअभावी धरणात समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. सद्य:स्थितीत मोठय़ा व मध्यम प्रकल्पात २०७१८ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ३१ टक्के जलसाठा आहे. त्यात गंगापूर ६६ टक्के, काश्यपी ४५, गौतमी गोदावरी ४२, पालखेड २९, करंजवण २५, वाघाड ३४, ओझरखेड धरणात सर्वात कमी म्हणजे केवळ ८ टक्के जलसाठा आहे.
तीसगाव धरण कोरडेठाक आहे. पुणेगाव धरणात ३४ टक्के, दारणा ५१, भावली ८५, मुकणे २६, वालदेवी ७१, नांदुरमध्यमेश्वर ५९, कडवा ५१, आळंदी ४१, भोजापूर १८, चणकापूर येथे ५२, पुनद ४८, हरणबारी ५४, केळझर ३३ तर गिरणा धरणात केवळ तीन टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.
गतवर्षी या धरणांमध्ये एकूण ४८ हजार ७७१ दशलक्ष घनफूट पाणी होते. यंदा हा जलसाठा २० हजार ७१८ वर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा