नाशिक – मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील घोटीलगतचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे सिन्नर, शिर्डीकडे जाणाऱ्या त्रिफुलीवरील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची मुक्तता झाली आहे. या त्रिफुलीवर आजवर अनेक अपघात झाले आहेत. उड्डाण पुलामुळे तो धोका कमी झाला. शिवाय, पुलालगतच्या सेवा रस्त्यानेही वाहनधारक सिन्नर, शिर्डीकडे मार्गस्थ होतात. नाशिक-मुंबई दरम्यान दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचा प्रवास यामुळे सुखद झाला आहे.
महामार्गावरील घोटी ही इगतपुरी तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे. भातावर प्रक्रिया करणाऱ्या मिल, बाजार समिती यामुळे आसपासच्या भागातून या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. घोटीतून सिन्नर, शिर्डीकडे जाणारा रस्ता आहे. महामार्गावरील या त्रिफुलीवर वाहतूक कोंडी व अपघातांना तोंड द्यावे लागत होते. नाशिक-मुंबई दरम्यान प्रवास करणारी वाहने या कोंडीत १५ ते २० मिनिटे अडकून पडत. कधीकधी वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर, या त्रिफुलीवर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुमारे दोन वर्ष त्याचे काम सुरू होते. या कामामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या भागातून मार्गस्थ होण्यास कालापव्यय होत होता. उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे अलिकडेच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले.
महामार्गावरील उड्डाण पुलाच्या दोन्ही मार्गिका खुल्या झाल्यामुळे नाशिक-मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सहजपणे मार्गस्थ होता येते. मुंबईहून येणाऱ्या वाहनधारकांना महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरून खालील भागातून उजवे वळण घेऊन मार्गस्थ होण्याची व्यवस्था करण्यात आली असून सिन्नर, शिर्डीकडून येणाऱ्या वाहनधारकांनाही सेवा रस्त्याने राष्ट्रीय महामार्गावर येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उड्डाण पुलामुळे त्रिफुलीवरील वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका बऱ्याच प्रमाणात दूर झाला आहे.
पिंप्री सदो उड्डाण पुलावरून समृद्धीवर जाण्याची व्यवस्था
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी भरवीर एक्स्जेंच (आंतरबदल) येथे जाण्यासाठी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्री सदो येथील उड्डाणपुलाचे कामही मध्यंतरी पूर्ण करण्यात आले. हा पूलदेखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाने जाण्यास इच्छुक आणि समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांना राष्ट्रीय महामार्गावर सहजपणे ये-जा करण्यासाठी ही व्यवस्था झाली आहे.