नाशिक: पहिल्याच पावसात नाशिक-मुंबई महा मार्गाची दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे, अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आदींमुळे या प्रवासासाठी आठ ते १० तासांचा कालावधी लागत आहे. या महामार्गाचा भिवंडी वळण रस्त्यापर्यंतचा भाग तीन यंत्रणांकडे विभागलेला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी या रस्त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे सोपवावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. या महामार्गाच्या प्रश्नावर सोमवारी सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होणार आहे.
या महामार्गाच्या स्थितीकडे भाजपच्या आमदार फरांदे यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. यापूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठक घेतल्यानंतर महामार्गाच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली होती. आधीच वाहतूक कोंडी, ठाणे जिल्ह्यात महामार्गालगतच्या गोदामांमुळे होणारी अवजड वाहनांची वाहतूक आदी कारणांनी या महामार्गावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे ठरले होते. यात पावसाची भर पडून महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. पहिल्याच पावसात नाशिक-मुंबई रस्त्याची बिकट स्थिती झाली आहे. ही बाब फरांदे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.
हेही वाचा : नाशिक : सुरगाण्यात पुरात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू, घाटमाथ्यावर पावसाची हजेरी
नाशिक-मुंबई प्रवासासाठी आठ ते १० तासांचा अवधी लागतो. महामार्गाचा भिवंडी वळण रस्त्यापर्यंतचा भाग राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन यंत्रणांकडे विभागून आहे. रस्त्यांवरील खडड्यांसाठी कोणाला जाब विचारायचा, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. नाशिक-मुंबई महामार्गाचा सर्वाधिक भाग राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे असल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या रस्त्याचे संपूर्ण काम प्राधिकरणाकडे देण्याची मागणी फरांदे यांनी केली. या बैठकीनंतर महामार्गाच्या स्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.