लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : रिक्त पदांवर कार्यरत स्त्री अधीक्षका आणि पुरूष अधीक्षक यांच्या मानधनात वाढीव दराप्रमाणे वाढ करावी, २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील रोजंदारी, तासिका कर्मचारी यांचे मानधन विनाविलंब देण्यात यावे, यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन व चार कर्मचारी संघटनेने ईदगाह मैदानापासून मुंबईच्या दिशेने पायी प्रस्थान केले.
आणखी वाचा-शिक्षण विभागातर्फे शालेय पुस्तकांचे वितरण
शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह रोजंदारी, तासिका तत्वावरील वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासूनच्या प्रलंबित मागण्यांबाबत वर्षभर पाठपुरावा करूनही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. २०२३-२०२४ मधील कार्यरत रोजंदारी तासिका वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी यांच्याविषयी धोरणात्मक निर्णय घेऊन थेट विनाअट समायोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. नाशिक, नागपूर, अमरावतीसह अन्य विभागातून कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले आहेत. सोमवारी रात्री वाडीवऱ्हे परिसरात मुक्काम करुन मोर्चा पुढे मार्गस्थ होणार असल्याची माहिती ललित चौधरी यांनी दिली.