नाशिक – गंगापूर धरणातील जल प्रदूषणाच्या मुद्यावरून पूजनाला झालेला विरोध बाजूला ठेवत महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी धरण परिसरात विधीवत जलपूजन केले. माजी महापौर दशरथ पाटील यांनी धरणातील जल प्रदूषणाबाबत उपस्थित केलेले मुद्दे धरण अर्थात पाटबंधारे विभागाशी संबंधित आहेत. या अनुषंगाने संपूर्ण माहिती घेऊन त्या विभागाला कळविले जाईल. मनपा धरणातील पाणी प्रथम शुध्दीकरण केंद्रात नेते तिथे योग्य प्रकारे प्रक्रिया करून अतिशय शुध्द पाणी शहरवासीयांना पुरवले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला कुठलाही धोका नाही, असा निर्वाळा डॉ. करंजकर यांनी दिला.

हेही वाचा >>> “पोलीस नातवांना सांगतात, तुमची जिंदगी बरबाद”, ललित पाटीलच्या वडिलांचा आरोप; म्हणाले, “आई-बापाने…”

लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात गंगापूर धरणावरील जलपूजन हा लक्षवेधी सोहळा असतो. समस्त नगरसेवक आणि अधिकाऱ्यांसाठी ती एक सहलच असते. त्या कार्यक्रमात आवर्जुन सर्वजण उपस्थित असतात. प्रशासकीय राजवटीतही त्याचे महत्व कमी झालेले नाही. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात शहराला पाणी पुरवठा करणारे धरण तुडुंब झाले. परंतु, गोदावरी खोऱ्यातील जायकवाडीत पुरेसा जलसाठा नसल्याने वरील भागातील धरणांमधून पाणी सोडावे लागणार आहे. यात गंगापूर धरणाचाही समावेश आहे. लवकरच हे पाणी सोडावे लागणार असताना तत्पुर्वी जलपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. गंगापूर धरणातील पाणी प्रदूषित असून मनपाने जल पूजन टाळावे, अशी मागणी माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली होती. शेवाळ आलेल्या पाण्याचे तरंंग, मलमूत्र वाहणाऱ्या पाण्यासारखा धरणाच्या कडेला तवंग दिसत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. प्रथम स्वच्छ व निर्मळ पाणी देऊन नाशिककरांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. नंतरच मनपा प्रशासनाने जलपूजन करावे, असे निवेदन पाटील यांनी आयुक्तांना दिले होते. पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार महापालिकेच्यावतीने जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. करंजकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त विजयकुमार मुंडे, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, राजेंद्र शिंदे, रवींद्र धारणकर, प्रकाश निकम, डॉ. आवेश पलोड असे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आयुक्त डॉ. करंजकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी महापौरांनी घेतलेल्या आक्षेपांवर भाष्य केले. मुळात गंगापूर धरणातील प्रदूषणाबाबत संपूर्ण माहिती घेऊन ती पाटबंधारे विभागाला कळविली जाईल. कारण धरणाशी संबंधित ही माहिती आहे. महानगरपालिका दररोज धरणातून पाणी उचलते. शहरात पाणी पुरवठा करण्याआधी त्यावर शुध्दीकरण केंद्रात काटेकोरपणे प्रक्रिया केली जाते. शहरवासीयांना अतिशय शुध्द पाण्याचा पुरवठा केला जातो, असे त्यांनी नमूद केले.

Story img Loader