नाशिक – गोदावरीच्या पात्रात सांडपाणी मिसळू नये तसेच नदीचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांनी दिले.

मनपा हद्दीतील गोदावरी नदीच्या पात्राची डॉ. करंजकर यांनी पहाणी केली. गंगापूर रस्त्यावरील शहीद अरुण चित्ते पूल, वन विभाग रोपवाटिका, परीची बाग, गोदा पार्क परिसर आदी परिसरात खातेप्रमुखांसह फिरून गोदावरीच्या स्थितीचा त्यांनी आढावा घेतला. या भागात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली पसरल्या आहेत. काही ठिकाणी नदीचे पात्रही दृष्टीस पडत नाही. सांडपाणी थेट पात्रात मिसळते. गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपाय अवलंबावेत, असे त्यांनी सूचित केले. गोदापात्रात सांडपाणी जाणार नाही यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. दुषित पाण्यामुळे पात्रात पाणवेली पसरतात. पाणवेली वाढणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी मांडली. उपाय योजनांबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना डॉ. करंजकर यांनी दिले. गोदावरी नदीत वाढलेल्या पाणवेली काढण्याची सूचनाही करण्यात आली.

हेही वाचा >>>जळगावातील आकाशवाणी चौकात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

हेही वाचा >>>धुळ्यात ठाकरे गटाचे कांदाफेक आंदोलन; निर्यात शुल्कवाढ रद्द न झाल्यास सत्ताधाऱ्यांना गावबंदीचा इशारा

या दौऱ्यात गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, रवींद्र धारणकर, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे आदी सहभागी झाले होते.