नाशिक : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीच्या सुमारे सहा किलोमीटरच्या मार्गाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी मोटारीतून पाहणी केली. प्रमुख चौकात थांबून त्यांनी माहिती घेतली. अतिक्रमण हटविणे, रस्त्यांची डागडुजी व परिसरात स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले. शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा बराचसा मार्ग अतिशय दाटीवाटीच्या परिसरातून जातो. या मार्गावर लोंबळकणाऱ्या तारा, अतिक्रमणे, मार्गावरील खड्डे आणि तत्सम अडचणी गणेश मंडळांकडून याआधी झालेल्या बैठकांमधून मांडल्या गेल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मिरवणूक मार्गाशी संबंधित प्रश्न जाणून घेण्याच्या दृष्टीकोनातून आयुक्त डॉ. करंजकर यांनी या भागाचा दौरा केला. वाकडी बारवपासून सुरू होणारी मिरवणूक सुमारे सहा किलोमीटरचे अंतर पार करत गोदावरी काठावर गौरी पटांगण, रामकुंड येथे येते. या संपूर्ण मार्गावरील स्थितीची आयुक्तांनी पाहणी केली. वाकडी बारव, फाळके रोड, दूध बाजार, गाडगे महाराज पुतळा परिसर, मेन रोड, धुमाळ पॉईंट, एम.जी. रोड, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मालेगांव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, रामकुंड परिसर, गौरी पटांगण,म्हसोबा पटांगण असा हा मार्ग आहे. मोटारीतून मार्गक्रमण करताना आयुक्त प्रत्येक प्रमुख चौकात थांबून आढावा घेत होते.

हेही वाचा : मानसिकदृष्टय़ा अपंग बालकांच्या पंखांना अर्थबळ हवे! नाशिकच्या मनाली संस्थेची साद

मार्गाची स्थिती, चौकातून जाणारे व येणारे रस्ते, आदींबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त नितीन नेर, कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, संदेश शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे आदी उपस्थित होते. मनपा अधिकाऱ्यांचा ताफा प्रमुख चौकात थांबत होता. पाहणी करून पुढे मार्गस्थ होत होता. मार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. मिरवणुकीत ती अडथळा ठरू शकतात. ही अतिक्रमणे तातडीने हटविण्याची सूचना आयुक्तांनी केली.

हेही वाचा : व्यापारी आक्रमक,सरकार बचावात्मक; बैठकीत पालकमंत्र्यांसमोर वाग्बाण,शुक्रवारी कांदा व्यापाऱ्यांची बैठक

पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यास सांगण्यात आले. गणेशोत्सवात शहरासह मिरवणूक मार्ग व गोदाकाठ परिसरात नियमित स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यावरणस्नेही गणेशोत्सवात मनपा दरवर्षी गणेश मूर्ती संकलन उपक्रम राबविते. यंदाही जास्तीत जास्त गणेशभक्तांनी मूर्ती दान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, आवाहन डॉ. करंजकर यांनी केले.

दिशादर्शकावर राजकीय फलक

पाहणी दौऱ्यात मनपाच्या दिशादर्शक फलकांवर राजकीय पुढाऱ्यांचे फलक लागल्याचे दृष्टीपथास पडले. हे फलक हटविण्याचे निर्देश आयुक्त डॉ. करंजकर यांनी दिले.