बाजारपेठांमध्ये नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईला वेग
नाशिक : शहरातील करोनाची स्थिती काहीअंशी नियंत्रणात आली असताना आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये उसळलेली गर्दी चिंता वाढविणारी ठरत आहे. करोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणेने गर्दीच्या ठिकाणी नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाईला वेग दिला आहे. गेल्या महिन्यात नाशिकरोड आणि सिडको विभाग वगळता इतरत्र फारशी कारवाई झाली नव्हती. आता मात्र सर्वच विभागांत गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतराचे पथ्य न पाळणारे, मुखपट्टी परिधान न करणारे, थुंकीबहाद्दर आदींविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मुखपट्टी नसणाऱ्या ग्राहकांना माल विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवरही दंडाचा बडगा उगारण्यात आला आहे.
शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६३ हजारांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. यातील ५९ हजारहून अधिक रुग्ण बरे झाले, तर सध्या दोन हजारहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा दीडशेपेक्षा खाली आला आहे. दीड, दोन महिन्यांपूर्वीच्या स्थितीचा विचार करता शहरात करोनावर नियंत्रण मिळवण्यात काही अंशी यश आले असून पुढील काळात करोनाची दुसरी लाट येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
करोनाचा आलेख खाली येत असताना निर्बंध शिथिल झाले. सध्या तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये अलोट गर्दी होत आहे. मेनरोड, रविवार कारंजा, दहीपूल, सराफ बाजार अशा सर्व भागांत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.
याआधी गणेशोत्सव आणि विसर्जनावेळी नागरिकांची अनेक ठिकाणी अशीच गर्दी झाली होती. त्यानंतर करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढल्याचा ताजा इतिहास आहे. निर्बंध शिथिल झाले असले तरी करोनासंबंधीच्या नियमांचे पालन बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महापालिका आणि पोलीस यांच्याकडून कारवाईला वेग दिला गेला असून दिवाळीनंतरही ती सुरू राहणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले.
प्रत्येक विभागात महापालिका आणि पोलीस अशा चार ते पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असणारी प्रत्येकी १० पथके कार्यरत आहेत. मुख्य बाजारपेठा आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी संबंधितांकडून नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होत आहे. मुखपट्टी परिधान न करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत २९२७ प्रकरणात पाच लाख ८५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेत व्यावसायिकांनाही सहभागी करून घेण्यात आले. प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागात ‘मुखपट्टी नाही तर प्रवेश नाही’ हा फलक लावणे बंधनकारक आहे.
मुखपट्टी नसणाऱ्या ग्राहकांना माल विक्री करणाऱ्या दुकानदारांवरही दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे डॉ. कुटे यांनी सांगितले. करोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
नाशिकरोड, सिडको विभाग आघाडीवर करोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेने आतापर्यंत २९२७ प्रकरणांत कारवाई केली आहे. त्याअंतर्गत मुखपट्टी न वापरल्यावरून दोन हजार ६५ जणांकडून चार लाख १३ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली. ऑक्टोबपर्यंतचा अहवाल लक्षात घेतल्यास मुखपट्टी परिधान न केल्यावरून नाशिकरोड विभागात ८७५ तर सिडको विभागात ८५६ जणांवर कारवाई करण्यात आली. या दोन विभागांत धडकपणे कारवाई करण्यात आली. परंतु, सातपूर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि पंचवटी विभागात कारवाईची आकडेवारी ३९ ते १६० च्या मर्यादेत राहिली. एका महिन्यात महापालिकेच्या पथकांना रस्त्यावर थुंकणारे १७ जण आढळले. त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.