भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांचा गौरवशाली इतिहास सर्वासमोर यावा, या माध्यमातून नाशिकच्या कलावंताची ओळख सर्वदूर पोहचावी, नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने महापालिकेने पांडवलेणी परिसरात दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली. मात्र, महापालिकेच्या कार्यपध्दतीमुळे या उद्देशाला छेद दिला गेल्याची प्रतिक्रिया रसिकांमध्ये उमटत आहे. स्मारकात विविध चित्रपटांच्या दिलेल्या माहितीत काही चुक आहे की नाही, याबद्दल खुद्द महापालिका अनभिज्ञ आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेले दादासाहेब फाळके हे नाशिकचे सुपुत्र. त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी महापालिकेने ३० नोव्हेंबर २००१ रोजी दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पांडवलेणी परिसरातील हे स्मारक स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देणारे ठरेल अशी आशा होती. या ठिकाणी अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावी यासाठी दादासाहेब फाळके चित्र प्रदर्शन सभागृह, लहान मुलांसाठी बगीचा, संगीत कारंजे, उपाहारगृह आदी सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. याच परिसरात पांडवलेणी आणि बुद्धविहार असल्याने फाळके स्मारक परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा सातत्याने राबता राहिला. दादासाहेब फाळके यांच्या कार्याचा परिचय देणारे छोटेखानी प्रदर्शन या ठिकाणी आहे. यासाठी महापालिकेचे ज्येष्ठ सहाय्यक मधुकर झेंडे आणि शहरातील नामांकित फोटो लॅबचे सहकार्य घेऊन माहिती संकलित केली गेली. या ठिकाणी हिंदी चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांंचा इतिहास चित्राच्या माध्यमातून मांडण्यात आला. त्यात पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’पासून ते २००० सालापर्यंतच्या महत्वपूर्ण चित्रपटांची माहिती संक्षिप्त स्वरुपात देण्यात आली आहे. तसेच चित्रपट सृष्टीचा अभ्यास करण्यासाठी लघूपट, माहितीपट यासह काही संदर्भ साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या चित्र प्रदर्शनातील काही संदर्भ चुकीचे असल्याच्या तक्रारी चित्रपट रसिकांनी केल्यावर पालिकेने कानावर हात ठेवले आहेत.
चित्र प्रदर्शनात दिलेली काही माहिती चुकीची असल्याबद्दल पालिकेचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. स्मारकातील कामकाज कसे चालते, दादासाहेबांच्या दुर्मीळ चित्रकृतींची सद्यस्थिती, तेथे चित्रपट दाखविण्यासाठी उभारण्यात आलेले पडदे यासह अन्य काही सेवांविषयी अधिकारी अनभिज्ञ असून हा कारभार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे.
दुसरीकडे, बगीच्यातील खेळण्यांची दुरावस्था पाहता बालकांसाठी ते धोकादायक आहे. रंग उडालेल्या भिंती, बंद पडण्याच्या स्थितीत असलेले उपाहारगृह, बंद कारंजे, बंद असलेले वॉटर पार्क, लघुपट पहाण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे नागरिकांनीही या प्रकल्पाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे अपेक्षित महसूल मिळत नसल्याने महापालिकेने त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. आतापर्यंत दहा लाखाहून अधिक नागरिकांनी फाळके स्मारकास भेट दिली. सध्या या प्रकल्पाची दुरवस्था झाली असून उत्पन्न वाढीसाठी पालिका त्याचे खाजगीकरण करण्याच्या विचारात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा